मुंबई - दुष्काळग्रस्त भागात नुकसान भरपाईपोटी मदतनिधीचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. हा निधी लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात तातडीने जमा करावे, असे निर्देश मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी आज येथे दिले.
दुष्काळग्रस्त भागातील मदतनिधीसाठी १४५० कोटींचा पहिला हप्ता वितरित - दुष्काळग्रस्त
2019-02-05 18:37:54
तातडीने निधी लाभार्थ्यांच्या थेट खात्यात जमा करण्याचे मुख्य सचिवांचे निर्देश
राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्य सचिवांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना, महाडीबीटी आणि दुष्काळग्रस्त भागात निधीच्या वाटपाबाबत आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यु.पी.एस. मदान, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले उपस्थित होते.
राज्यात दुष्काळग्रस्त भागामध्ये मदत निधीचे वाटप सुरु करण्यात आले असून त्यासाठी 1 हजार 450 कोटी रुपयांचा पहिला हप्ता सर्व विभागीय आयुक्तांना वितरित करण्यात आला आहे. त्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना आणि तेथून संबंधित तालुक्यांच्या तहसिलदारांना हा निधी वर्ग केला जाईल. त्यांच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त गावांतील शेतकऱ्यांच्या थेट खात्यात हा निधी वितरित केला जाईल. यासाठी बहुतांश जिल्ह्यांमध्ये गावनिहाय याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून काही जिल्ह्यांनी याद्या पूर्ण झालेल्या गावांमध्ये निधीदेखील वितरित केला आहे.
दुष्काळ मदतनिधीचे वितरण तातडीने व्हावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संनियंत्रण करावे, असे निर्देश मुख्य सचिवांनी यावेळी दिले. याद्या तयार करण्याचे काम तातडीने पूर्ण करुन तातडीने निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावा, असेही मुख्य सचिवांनी सांगितले. यावेळी प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेच्या कामाचा आढावा देखील मुख्य सचिवांनी घेतला. या योजनेच्या कामाला गती द्यावी, असेही त्यांनी सांगितले.