नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील'जैश'च्या तळांवर केलेल्या हल्ल्यात ठार झालेल्यांच्या आकडेवारीवर प्रश्न विचारले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आज भारतीय हवाई दलाचे प्रमुख बी.एस. धनोआ यांनी पत्रकार परिषद घेतली. लक्ष्यावर प्रहार झाला की नाही हे पाहणे आमचे काम आहे. हल्ल्यात किती जण ठार झाले हे आम्ही पाहत नाही, ते काम सरकार करत असते, असे धनोआ यांनी यावेळी स्पष्ट केले.
पाकिस्तानच्या ताब्यातून विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका झाल्यानंतर आज पहिल्यांदाच हवाई दलाने पत्रकार परिषद घेतली. आम्ही अचूक ठिकाणांवरच हल्ला केला आहे. जर आम्ही जंगलात बॉम्ब टाकले असते तर पाकिस्तानने यावर प्रतिक्रिया दिली असती का?, असा प्रतिप्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला. मिग-२१ सशक्त विमान आहे. ते सध्या अद्ययावत करण्यात आले आहे. शस्त्रास्त्रांनी हे विमान सज्ज असल्याचेही यावेळी धनोआ यांनी सांगितले. पाकिस्तानने या कारवाईत एफ-१६ विमानाचा वापर केला. याचा अर्थ ते आपल्याविरोधात या विमानांचा वापर करत आहेत, असेही धनोआंनी सांगितले.