नवी दिल्ली Mizoram Chief Minister : मिझोरममध्ये लालदुहोमा यांचा पक्ष झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) ला प्रचंड बहुमत मिळालं आहे. ४० सदस्यांच्या विधानसभेत त्यांच्या पक्षाला २७ जागांवर विजय मिळाला. ७४ वर्षीय लालदुहोमा हे माजी आयपीएस अधिकारी आहेत. १९८४ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यापूर्वी ते तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सुरक्षेत तैनात होते.
पंतप्रधानांच्या सुरक्षा दलात होते : आयपीएस अधिकारी म्हणून लालदुहोमा यांनी गोव्यात तस्करांविरुद्ध दीर्घ लढा दिला होता. त्यांच्या कार्यानं प्रभावित होऊन त्यांना पंतप्रधानांच्या सुरक्षा दलात स्थान देण्यात आलं. तेव्हापासून त्यांचा राजकारणात रस वाढू लागला. कालांतरानं, लालदुहोमा यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांची मिझोरम काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
मिझो नॅशनल फ्रंटला मुख्य प्रवाहात आणलं : लालदुहोमा जेव्हा राजकारणात आले, तेव्हा मिझो नॅशनल फ्रंटनं भारत सरकारच्या विरोधात भूमिका घेतली होती. दोघांमध्ये शांतता करार करण्यात लालदुहोमा यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या प्रयत्नांमुळेच मिझो नॅशनल फ्रंटचे नेते लालडेंगा मुख्य प्रवाहात परतले. मात्र, ज्या दिवशी लालडेंगा आणि इंदिरा गांधी यांची भेट होणार होती, त्याच दिवशी इंदिरा गांधींची हत्या झाली.