नवी दिल्ली - महाराष्ट्रात झिकाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क झाले आहे. महाराष्ट्रातील झिकाची स्थिती जाणून घेण्याकरिता आणि राज्याला मदत करण्याकरिता आरोग्य मंत्रालयाचे उच्चस्तरीय पथक महाराष्ट्रात रवाना झाले आहे. पुणे जिल्ह्यात झिकाचा रुग्ण आढळल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
केंद्राच्या आरोग्य पथकामध्ये पुणे विभागाचे प्रादेशिक संचालक, नवी दिल्लीमधील लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजच्या स्त्रीरोगतज्ज्ञ आणि राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्थेच्या (NIMR) एन्टोमोलॉजिस्ट, आयसीआएमआर यामधील तज्ज्ञ असणार आहेत. हे पथक राज्याच्या आरोग्य पथकाबरोबर जवळून काम करणार आहे.
आरोग्य मंत्रालयाचे पथक असे करणार काम-
प्रत्यक्ष जमिनी काय स्थिती आहे, हे आरोग्य पथकाकडून पाहिले जाणार आहे. तसेच केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे झिकाच्या व्यवस्थापनाकरिता कृती कार्यक्रमाचे पालन होते की नाही, याचे मूल्यांकन केले जाणार आहे. केंद्रीय पथकाकडून राज्यातील झिकाच्या व्यवस्थापनाकरिता आवश्यक त्या शिफारशी केल्या जाणार आहेत.
राजेश टोपे यांनी ही दिली होती प्रतिक्रिया
पुणे जिल्हयातील पुरंदर तालुक्यात 'झिका'चा रुग्ण आढळून आला आहे. याबाबत काळजी करण्याची गरज नाही, या आजाराच्या रुग्णामध्ये जी लक्षणे आढळून आली आहे. त्यानुसार उपचार केले जात आहेत, अशी प्रतिक्रिया नुकतेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. पुरंदर तालुक्यात साठलेल्या गोड पाण्यावर ईडीस डासांची उत्पत्ती होऊ नये, म्हणून आवश्यक पाऊल उचलून सर्वेक्षण करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आल्याची माहितीदेखील आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे.
पुण्यात झिका व्हायरसचा पहिला रुग्ण प्रकृती ठणठणीत
पुणे जिल्ह्यामधील पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे झिका व्हायरसचा एक रुग्ण आढळून आला असून हा या आजाराचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण आहे. झिका व्हायरसची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी झाली असून तिला तसेच कुटुंबियांमध्येही कोणाला काही लक्षणे नाहीत, असे आरोग्य विभागामार्फत सांगितले.
काय आहे झिका आजार?
झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार असून या आजारात ८० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. इतर रुग्णांमध्ये ताप, अंगदुखी, डोळे येणे, अंगावर पुरळ उठणे, सांधेदुखी अशी लक्षणे आढळतात. झिका आणि इतर कीटकजन्य आजारासाठी सर्वेक्षण सक्षम करत असतानाच कोरोना सर्वेक्षण आणि लसीकरण याकडे दुर्लक्ष होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना आरोग्य विभागाने निर्देश दिले आहेत.