बंगळुरु - कर्नाटकातील हिजाब प्रकरणाचं ( Hijab Controversy ) लोण सगळीकडे पसरत आहे. कर्नाटकात हिजाबविरोधात निदर्शनं करणाऱ्यांनी घेरल्यानंतर त्यांना प्रतिकार करणाऱ्या बीबी मुस्कान खान या तरुणीची काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी ( Zeeshan Siddique meet Muskan Khan ) भेट घेतली. याची माहिती त्यांनी टि्वट करून दिली.
हिजाब घालण्याच्या अधिकारापासून रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या फॅसिस्टांच्या विरोधात खंबीरपणे उभे राहिलेल्या कर्नाटकातील तरुणीची भेट घेतल्याचे त्यांनी टि्वटमध्ये म्हटलं. त्यांनी मुस्कानचा उल्लेख कर्नाटकची शेरनी असा केला. बंगळुरू ते मंड्या 100 किमी चालल्यानंतर धाडसी मुलगी मुस्कान खान आणि तिच्या कुटुंबाला भेटलो. तिच्या शौर्याचे कौतुक केले, असे टि्वट झिशान सिद्दीकी यांनी केले आहे. तसेच त्यांनी मुस्कानला एक स्मार्ट वॉच आणि एक आयफोन भेट म्हणून दिला.
काय प्रकरण ?
बीबी मुस्कान खानला मंड्या येथील पीईएस महाविद्यालयात हिजाब परिधान केल्यानं निदर्शकांनी घोषणा देत घेरलं. यावेळी निदर्शकांना तिनं घोषणा देत प्रत्युत्तरही दिलं. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. या प्रकरणाने जोर धरला आहे. खरे तर हिजाबचा हा मुद्दा कर्नाटकात जानेवारीमध्ये सुरू झाला होता. जानेवारीमध्ये उडुपी येथील सरकारी पीयू कॉलेजमध्ये 6 मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब घालून वर्गात बसण्यापासून रोखण्यात आले होते. महाविद्यालयाने गणवेश धोरणाचे कारण सांगितले, त्यानंतर विद्यार्थिनींनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि असा युक्तिवाद केला की त्यांना हिजाब घालण्याची परवानगी न देणे हे घटनेच्या कलम 14 आणि 25 अंतर्गत मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे.
कर्नाटकात महाविद्यालये आणि शाळांबाहेर हिजाब समर्थक आणि हिजाब विरोधक गटांकडून निदर्शने करण्यात येत आहे. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माणा झाली आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने शाळा आणि महाविद्यालये 12 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा -Saamana Editorial On Modi : मोदींनी ज्या संसदेच्या पायरीवर डोके ठेवले ती संसद अश्रू ढाळत असेल!