नवी दिल्ली: भारताने बंदी घातलेला वादग्रस्त धर्मोपदेशक असलेल्या झाकीर नाईकला भारतीय तपास यंत्रणा लवकरच ताब्यात घेऊ शकतात. नाईक हा सध्या ओमान देशाच्या दौऱ्यावर असून, भारतीय अधिकाऱ्यांनी तेथील प्रशासनाकडे नाईक याचा ताबा मागितला आहे. ओमानमधून हस्तांतरण करून नाईक याला भारतात आणले जाऊ शकते. नाईक याच्यावर भारतात विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून, त्याच्या संस्थेवरही भारत सरकारने बंदी घातलेली आहे.
कोण आहे झाकीर नाईक:केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, नाईक हा इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचे ( IRF )चा संस्थापक आहे. धर्मोपदेशक असलेला झाकीर नाईक तरुणांचे जबरदस्तीने इस्लाम धर्मात धर्मांतर करण्यास प्रोत्साहन देत असल्याचा आरोप आहे. तो आत्मघाती बॉम्बस्फोटांचे समर्थन करून हिंदू, हिंदू देव देवतांविरूद्ध तसेच इतर धर्मांविरुद्ध आक्षेपार्ह बोलत असतो. झाकीर नाईक भारत आणि परदेशातील मुस्लिम तरुण आणि दहशतवाद्यांना दहशतवादी कृत्ये करण्यासाठी आणखी प्रेरित करत असल्याचाही आरोप त्याच्यावर आहे.
संघटनेवर आहे पाच वर्षांची बंदी:गेल्या वर्षी मार्चच्या सुरुवातीला गृह मंत्रालयाने झाकीर नाईकने स्थापन केलेल्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (IRF) ला बेकायदेशीर संघटना घोषित करून त्याच्या संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी घातली होती. तसेच केंद्र सरकारच्या विविध यंत्रणांनी नाईक याच्या संस्थेसह त्याच्या अनेक मालमत्तांवर छापे टाकले होते. त्यातून नाईक करत असलेल्या कारनाम्यांची माहिती तपास यंत्रणांना मिळालेली आहे.
फिफा विश्वचषकात दिले होते व्याख्यान:दरम्यान, गेल्या वर्षीच्या अखेरीस कतारमध्ये झालेल्या फुटबॉल विश्वचषकाच्या सामन्यावेळी झाकीर नाईक याला व्याख्याने देण्यासाठी विशेषरित्या निमंत्रित करण्यात आले होते. नाईक हा दहशतवादी कृत्यांशी संबंधित असल्याने त्याला अशाप्रकारे व्याख्यानासाठी निमंत्रित करू नये यासाठी भारताने मोठे प्रयत्न केले होते. मात्र तरीही नाईक याने विश्वचषकाच्या वेळी इस्लामवर व्याख्याने दिली होती. भारतीय तपास यंत्रणा या अनेक दिवसांपासून नाईक याच्या मागावर आहेत. नाईक याला ताब्यात घेण्यासाठी भारताचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत.
हेही वाचा: या कायद्याखाली अटक झाल्यास वर्षभर मिळत नाही जामीन, घ्या जाणून