हैदराबाद :वायएसआर तेलंगणा पक्षाच्या नेत्या वाय एस शर्मीला यांनी पोलिसांना मारहाण करुन गोंधळ घातला होता. पोलिसांना मारहाण प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी नामपल्ली न्यायालयाने वाय एस शर्मीला यांना 14 दिवसाची कोठडी ठोठावली आहे. वाय. एस. शर्मीला यांना चंचलगुडा कारागृहात पाठवण्यात आले आहे. न्यायालयाने त्यांना 8 मे पर्यंत कोठडी ठोठावली आहे. वाय एस शर्मीला यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.
वैद्यकीय चाचणीनंतर केले न्यायालयात हजर : वाय. एस. शर्मीला यांना पोलिसांनी अटक केले होते. त्यानंतर त्यांची महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. वैद्यकीय चाचणीनंतर पोलिसांनी वाय एस शर्मीला यांना नामपल्ली न्यायालयात हजर केले. पोलीस कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 24 तास काम करतात. वाय एस शर्मीला यांनी कायदा हातात घेतला आहे. त्यामुळे पोलिसांनी शर्मीला यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी वाय एस शर्मीला यांना रोखले असता, त्यांनी आपली गाडी जोरात पळवण्याचे आपल्या चालकाला सांगितले. त्यामुळे एक पोलीस जवान जखमी झाल्याची माहितीही पोलिसांनी न्यायालयाला दिली.
पोलिसांनी हात मोडण्याचा केला प्रयत्न :पोलिसांनी घराबाहेर जाण्यापासून रोखल्याने शर्मीला संतप्त झाल्या होत्या. त्यांनी पोलीस मनमानी करत असल्याचा आरोप पोलिसांवर केला. शर्मीला यांच्या वकिलाने मात्र शर्मीला यांना घराबाहेर जाण्यापासून रोखणाऱ्या पोलिसांनी त्यांच्या अंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. पोलिसांनी शर्मीला यांना धक्काबुक्की करुन त्यांचा हात मोडण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप शर्मीला यांच्या वकिलाने न्यायालयात युक्तीवाद करताना केला. त्यामुळे हा वाद झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप वाय. एस. शर्मीला यांनी केला.
उपनिरीक्षकांना मारली कानाखाली : शर्मीला या टीएसपीएससी पेपर लिक प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयटी कार्यालयाला घेराव घालण्यासाठी बाहेर जात होत्या. त्यावेळी त्यांचा पोलिसांसोबत वाद झाला होता. त्यांना विरोधी पक्षनेत्यांचा पाठींबा घेण्यासाठीही जायचे होते. मात्र पोलिसांनी अडवल्याने त्यांनी बराच गदारोळ केला. त्यानंतर वाय एस शर्मीला यांनी त्यांना अडवणाऱ्या महिला पोलीस शिपायाला ढकलून दिले. इतकेच नाही तर उपनिरीक्षकावर हात उचलला. त्यामुळे वाद झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. मात्र राज्यात लोकशाही उरली नसून मुख्यमंत्री केसीआर हे वाय एस राजशेखर रेड्डी यांच्या मुलीला घाबरत असल्याचा आरोप शर्मीला यांनी केला.
हेही वाचा - देव तारी त्याला कोण मारी..! बायकोला वाचवण्यासाठी नवरा आणि मित्राने मारली विहिरीत उडी, दोघांचाही मृत्यू बायको मात्र सुरक्षित