नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग वाढतच आहेत. देशातील बर्याच भागात पेट्रोल 100 रुपयांवर तर डिझेल 90 रुपयांच्या पुढे गेले आहे. यावरून आज युवक काँग्रेस संघटनेकडून शास्त्री भवन येथील पेट्रोलियम मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यांनी इंधन दरामध्ये कपात करण्याची मागणी केली.
गेल्या सात वर्षात मोदी सरकारने काहीच केले नाही. सरकार लोकांचे लक्ष खऱ्या प्रश्नांकडून वळवण्यासाठी फक्त 'जुमला' देत आहे. पण आता असे होणार नाही. शेतकरी रस्त्यावर बसले आहेत, गृहिणींना अडचणीचा सामना करावा लागत आहे, असे आयसीसीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. म्हणाले. मोदी आहेत तर महागाई आहे, अशी घोषणा त्यांनी केली. तसेच सरकारने इंधनाच्या किंमती कमी न केल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.