महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मराठा आरक्षणाचा वाद ते कुस्तीपटूंचं आंदोलन, जाणून घ्या २०२३ मधील जनसंघर्षाच्या मोठ्या घटना - २०२३ मधील आंदोलन

Protests In 2023 : २०२३ मध्ये तीन मोठ्या आंदोलनांची सर्वाधिक चर्चा झाली. यामध्ये कुस्तीपटूंचं आंदोलन, कावेरीच्या पाण्याच्या वाटपाबाबत कर्नाटक आणि तामिळनाडूमधील संघर्ष आणि मराठा आरक्षणाचा वाद चर्चेत राहिला. या तिन्ही आंदोलनांचे प्रतिध्वनी देशभर ऐकू आले. तिन्ही प्रकरणात सरकारला हस्तक्षेप करावा लागला, तेव्हाच या आंदोलनांची तीव्रता कमी झाली.

Protests In 2023
Protests In 2023

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 29, 2023, 7:08 PM IST

हैदराबाद Protests In 2023 : कधी कुस्तीपटूंचं आंदोलन, कधी मराठा आरक्षणाचा वाद तर कधी कावेरी पाणी वाटपावरून असंतोष. या सर्व घटनांनी २०२३ वर्ष चर्चेत राहिलं. ही तीन प्रकरणं अशी होती ज्यांनी संपूर्ण देशाला विचार करण्यास भाग पाडलं. मराठा आरक्षण, कावेरी पाणी वाद यासारखी काही प्रकरणं वर्षानुवर्षे सुरू आहेत. मात्र कुस्तीपटूंनी केलेलं आंदोलन वेगळं होतं. या प्रकरणात भारताच्या महिला खेळाडूंनी त्यांच्याच महासंघाच्या अध्यक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. चला तर मग, वर्षाच्या शेवटी या तिन्ही प्रकरणांवर एक नजर टाकूया.

1) कुस्तीपटूंचं आंदोलन : २०२३ वर्षाची सुरुवातच एका मोठ्या आंदोलनानं झाली. विनेश फोगट, साक्षी मलिक आणि अंशू मलिक या महिला खेळाडूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात जंतरमंतरवर निदर्शने सुरू केली. या खेळाडूंनी ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी पोलीस एफआयआर नोंदवत नसल्याच्या विरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

चार महिने कारवाई झाली नाही : ज्या वेळी या खेळाडूंनी आवाज उठवला, त्यावेळी ब्रिजभूषण सिंह हे फेडरेशनचे अध्यक्ष होते. काही महिला खेळाडूंनी आरोप केला की ब्रिजभूषण यांनी त्यांना अयोग्यरित्या स्पर्श केला आणि त्यांच्या संमतीशिवाय मिठी मारली. तसंच धमकावून कुस्ती स्पर्धेतून आपलं नाव काढून टाकल्याचा आरोपही त्यांच्यावर होता. जानेवारी महिन्यात झालेल्या आंदोलनानंतर खेळाडूंनी एप्रिलमध्ये पुन्हा आंदोलन केलं. खेळाडू म्हणाले की, सरकार जानेवारी महिन्यातच कारवाईबाबत बोललं होतं, परंतु एप्रिल महिन्यापर्यंत काहीही कारवाई झाली नाही.

आरोपींवर पॉक्सो लावला : यानंतर खेळाडूंनी पुन्हा जंतरमंतर गाठलं. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपींवर पॉक्सो कायदाही लावण्यात आला. संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाच्या दिवशी महिला कुस्तीपटूंसाठी महिला महापंचायत आयोजित करण्याची चर्चा होती. मात्र, ७ जून रोजी महिला खेळाडूंनी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेऊन आपला विरोध स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला.

2) कावेरीच्या पाण्यावरून वाद : कावेरी नदीच्या पाणी वाटपावरुन कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये बऱ्याच काळपासून वाद सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कर्नाटक सरकारनं तामिळनाडूसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र याला कर्नाटकातील शेतकऱ्यांनी विरोध केला. राज्यभरातून अनेक ठिकाणी हिंसाचार झाल्याच्या बातम्याही आल्या. बंगळुरू शहराला याचा मोठा फटका बसला. यामुळे शहरातील अनेक दुकानं बंद ठेवण्यात आली. तसंच मोठमोठे शॉपिंग मॉल्स आणि शाळा, महाविद्यालयंही बंद होती. मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितलं. तमिळनाडूच्या त्रिचीमध्येही कर्नाटकाविरुद्धचा संताप उफाळून आला. शेतकऱ्यांनी मेलेला उंदीर तोंडात ठेवून आंदोलन केलं. तंजावर, तिरुवरूर आणि नागापट्टिनम भागातील शेतकऱ्यांनी तिरुवरूर रेल्वे स्थानकावर गाड्या थांबवल्या होत्या.

3) मराठा आरक्षणासाठी आंदोलन : सकल मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं या मागणीसाठी मराठा आंदोलन सुरू झालं. या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आहेत. सर्व मराठ्यांना ओबीसी मानून त्यांना आरक्षण दिलं पाहिजे, अशी मागणी जरांगेंची आहे. १ सप्टेंबरला जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, ज्यानंतर आंदोलनाची तीव्रता आणखी वाढली. आंदोलनात झालेल्या हिंसाचारात २० हून अधिक सरकारी बसचं नुकसान झालं. नंतर सरकारनं आंदोलकांच्या मागणीचा विचार करण्याचं आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन स्थगित करण्यात आलं. मराठ्यांचा एक गट असाही आहे, ज्यांना आरक्षण हवंय, मात्र त्यांना कोणत्याही प्रकारे ओबीसी समाजात सामील व्हायचं नाही.

हे वाचलंत का :

  1. चंद्रयान ३ चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग, जगभरात वाजला भारतीय शास्त्रज्ञांचा डंका
  2. कसा झाला राष्ट्रवादीत राजकीय भूकंप? अजित पवारांच्या बंडखोरीमागं कुणाचा हात?
  3. सरत्या वर्षाच्या आयपीएल लिलावात 'हे' १० खेळाडू रातोरात बनले कोट्यधीश, पाहा संपूर्ण यादी

ABOUT THE AUTHOR

...view details