उत्तरकाशी :सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे चारधाम यात्रा भाविकांसाठी रद्द करावी लागली असल्याचे दिसत आहे. जगप्रसिद्ध यमुनोत्री आणि गंगोत्री धामचे द्वार यावर्षीही भाविकांच्या अनुपस्थितीत उघडण्यात येणार आहे. उत्तराखंड सरकारच्या नियमांनुसार जिल्हा प्रशासनाने गंगोत्री आणि यमुनोत्री धामच्या द्वारांना उघडण्याची तयारी केली आहे.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आज हे द्वार उघडण्यात येणार आहेत. यावेळी २५ पुरोहित तसेच प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. यावर्षीही भाविकांशिवाय चारधाम यात्रा सुरू होत आहे. दुपारी १२ वाजून १५ मिनिटांच्या मुहूर्तावर सहा महिन्यांसाठी हे द्वार विधिवत उघडण्यात येतील. सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी यमुना मातेची डोली शनिदेवाच्या डोलीसोबत यमुनोत्री धामकडे रवाना झाली आहे.