लखनऊ : खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सच्या थीम साँग लाँचिंगच्या निमित्ताने केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री अनुराग ठाकूर शुक्रवारी लखनऊला पोहोचले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जंतरमंतरवर चालू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत ते म्हणाले की, सरकार खेळाडू आणि कुस्तीपटूंबाबत पूर्णपणे संवेदनशील आहे. त्यांच्या सर्व मागण्या सरकारने पूर्ण केल्या आहेत. त्यांच्या आरोपांची गंभीर दखल घेतली जात आहे. सुप्रीम कोर्टानेही तसा आदेश दिला आहे. त्यामुळे आता आंदोलन करण्याचा काही उद्देश नाही. मी खेळाडूंना विनंती करतो की चौकशी पूर्ण होऊ द्यावी. दिल्ली पोलीस निष्पक्ष तपास करत आहेत. भारतीय ऑलिम्पिक संघटना कुस्ती महासंघाच्या निष्पक्ष निवडणुका घेईल.
ब्रिजभूषणच्या राजीनाम्यावर खेळाडू ठाम : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांसारखे अनेक दिग्गज कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांवर कारवाई करण्यासाठी 13 दिवसांपासून जंतरमंतरवर आंदोलन करत आहेत. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात पॉस्को कायद्यासह दोन गुन्हे दाखल केले आहेत. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. पण, ब्रिजभूषण शरण सिंह यांना अटक करण्यात यावी आणि त्यांनी भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, या मागणीवर खेळाडू ठाम आहेत.