दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेतले नवी दिल्ली : नवी दिल्लीच्या जंतर - मंतरवर झालेल्या प्रचंड गोंधळानंतर दिल्ली पोलिसांनी सर्व कुस्तीपटूंना ताब्यात घेऊन वसंत कुंज पोलीस ठाण्यात नेले आहे. कलम 144 चे उल्लंघन केल्यामुळे आता हा संप येथे संपला आहे. दिल्ली पोलिसांनी कलम 144 लागू केले आहे, मात्र आता कुस्तीपटू जंतरमंतरवर परत जाऊ शकणार नाहीत. अशा स्थितीत पोलिसांनी आंदोलनाची जागा रिकामी करण्यास सुरुवात केली आहे. सोबतच कुस्तीपटूंचे तंबूही काढले जात आहेत.
कुस्तीपटूंचे ट्विट : दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर येथून ताब्यात घेतल्यानंतर बजरंग पुनिया याने ट्विट केले की, 'कोणते सरकार आपल्या देशाच्या चॅम्पियन्सला अशी वागणूक दिते? आम्ही काय गुन्हा केला आहे. दुसरीकडे, कुस्तीपटू साक्षी मलिकने ट्विट करून म्हटले की, 'लैंगिक शोषण करणारा ब्रिजभूषण आज संसदेत बसला आहे आणि आम्हाला येथे रस्त्यावर ओढले जात आहे. आम्ही कोणता गुन्हा केला आहे?'
'हा लोकशाहीचा खून' :पोलिसांनी जंतरमंतर पूर्णपणे सील केले आहे. पैलवानांनी मार्च काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ताब्यात घेण्यात आले. साक्षी मलिक, विनेश फोगट, बजरंग पुनिया यांच्यासह सर्व कुस्तीपटूंना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना वेगवेगळ्या बसमधून नेण्यात आले आहे. त्यांना कोणत्या ठिकाणी नेले जाणार हे अद्याप समजलेले नाही. आम्हाला शांततेत महिला महापंचायत पार पाडायची होती आणि पोलिसांनी ती करू दिली नाही, हा लोकशाहीचा खून असल्याचे पैलवानांनी सांगितले. पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेतले आहे.
शेजारच्या राज्यांतून शेतकरी पोहचले : जंतरमंतरकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. असे असतानाही पैलवानांच्या समर्थनार्थ लोक मोठ्या संख्येने पोहोचत आहेत. कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाबमधून शेतकरी पोहोचत आहेत. परंतु त्यांना मध्येच थांबवण्यात आले आहे. त्याचवेळी जंतरमंतरच्या आजूबाजूच्या रस्त्यांवर अनेक समर्थक पोहोचले असून पोलीस त्यांना आत जाऊ देत नाहीत. आंदोलक शेतकरी सरकार आणि ब्रिजभूषण शरण यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत.
हे ही वाचा :
- Wrestlers Candle March : कुस्तीपटूंचा कँडल मार्च, संसद भवनासमोर होणार महिलांची महापंचायत