नवी दिल्ली :दिल्लीचेजंतरमंतर सध्यादेशभरातील स्टार कुस्तीपटूंचा आखाडा बनले आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर मानसिक आणि शारीरिक शोषणाचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्यावर कुस्तीपटू ठाम आहेत. दुसरीकडे, ब्रिजभूषण यांनी राजीनामा देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. ब्रिजभूषण शरण सिंह हे गेल्या 11 वर्षांपासून WFI चे अध्यक्षपद भूषवत आहेत. कुस्तीपटूंना दिल्ली महिला आयोग तसेच अभाविपच्या अनेक बड्या व्यक्तींचा पाठिंबा मिळाला आहे.
काय आहे वाद? : 18 जानेवारी रोजी जंतरमंतरवर सकाळी 11 वाजताच्या सुमारास साक्षी मलिक, विनेश फोगट, संगीता फोगट, अंशू मलिक, बजरंग पुनिया आणि सत्यव्रत कडयन यांच्यासह अनेक कुस्तीपटूंनी धरणे धरल्याने हा वाद सुरू झाला. कुस्तीपटूंनी महासंघाच्या अध्यक्षांवर लैंगिक छळाचा आणि मनमानी वृत्तीचा अवलंब केल्याचा आरोप केला. यानंतर या प्रकरणाने पेट घेतला. आंदोलन करणाऱ्या या खेळाडूंना सर्वत्र पाठिंबा मिळतो आहे. गीता फोगट, बबिता फोगट यांच्यासह इतर खेळाडूंनी या प्रकरणाबद्दल ट्विट केले आणि कुस्तीपटूंना पाठिंबा दिला. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी विनेश फोगट यांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा दिला. तसेच याप्रकरणी दिल्ली पोलिसांना नोटीसही पाठवली आहे.
कुस्तीपटूंचे आरोप : विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांच्यासह देशातील काही आघाडीच्या कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह आणि प्रशिक्षकांवर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती आणि ऑलिम्पियन विनेश फोगटने दावा केला आहे की अनेक प्रशिक्षकांनी महिला कुस्तीपटूंचेही शोषण केले आहे. या प्रकरणी अद्याप समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे या पैलवानांचे म्हणणे आहे. आतापर्यंत केवळ आश्वासने मिळाली आहेत, कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. महासंघाचे प्रमुख जोपर्यंत तुरुंगात जात नाहीत तोपर्यंत आम्ही हे प्रकरण सोडणार नाही. सरकारने कारवाई न केल्यास पोलिसांकडे जाऊ, अशी भूमिका कुस्तीपटूंनी घेतली आहे.
कुस्तीपटूंना वाढते समर्थन :हळूहळू चळवळ करणाऱ्या कुस्तीपटूंना बाहेरूनही पाठिंबा मिळू लागला. हरियाणातील खाप पंचायतींनी त्यांना पाठिंबा देत दिल्लीकडे मोर्चाची तयारी सुरू केली आहे. खाप पंचायतींनी कुस्ती महासंघाच्या अध्यक्षाविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर या प्रकरणात राजकीय पक्षांची देखील एन्ट्री झाली. भाजपचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री संजीव बाल्यान यांनी कुस्तीपटूंना पाठिंबा दिला आहे. त्यांनी बजरंग पुनियाशी फोनवर बोलून खेळाडूंचा सन्मान कमी होणार नाही, अशी ग्वाही दिली. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. ते म्हणाले की, देशातील महिला खेळाडूंच्या सुरक्षेच्या प्रश्नावर सरकार आपल्या नेत्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी अभाविपनेही आंदोलनस्थळी कुस्तीपटूंना पाठिंबा दिला.
कुस्तीपटूंनी क्रीडामंत्र्यांची भेट घेतली : गुरुवारी जंतरमंतरवर आंदोलन सुरूच होते. सायंकाळी उशिरा क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर चंदीगडहून दिल्लीला पोहोचले. रात्री १० वाजता त्यांनी आंदोलक पैलवानांना त्यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी जेवायला बोलावले. त्यांच्या निमंत्रणावरून कुस्तीपटू बजरंग पुनिया, विनेश फोगट, साक्षी मलिक, बबिता फोगट, सत्यव्रत आणि अंशू मलिक यांनी क्रीडामंत्र्यांची भेट घेतली. बैठकीपूर्वी माध्यमांशी बोलताना क्रीडामंत्र्यांनी खेळाडूंचे आरोप गंभीर असल्याचे सांगितले. तसेच आरोपांची चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले.