दिल्ली : कुस्तीपटू आणि कुस्ती परिषदेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यातील वाद आता चिघळला आहे. त्यामुळे भारतीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाला हे चांगले झाले असले तरी, गुन्हा दाखल झाल्यामुळे आम्हाला न्याय मिळेल का, असा सवाल दिग्गज खेळाडूंनी केला आहे. त्यामुळे ब्रिजभूषण सिंह यांना अटक करुन बडतर्फ करण्याच्या मागणीवर खेळाडू ठाम असल्याचे दिसून येते.
प्रियंका गांधी यांनी घेतली भेट - आज सकाळी आंदोलनस्थळी जाऊन काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आंदोलकांची भेट घेतली. तसेच त्यांची विचारपूस केली. या प्रकरणात पंतप्रधान किंवा सरकारकडून आपल्याला काहीही अपेक्षा नाही असे प्रक्षुब्ध उद्गार त्यांनी काढले. जर त्यांना काही वाटत असले असते तर त्यांनी आंदोलकांची भेट घेतली असती, तसेच कारवाईचे आदेश दिले असते असे प्रियंका म्हणाल्या.
कागदावरची लढाई सुरू झाली :ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटू दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलनाला बसले आहेत. कुस्तीपटूंच्या आंदोलनाची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतल्याने ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या अगोदरच ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करणे गरजेचे होते. मात्र तेव्हा कुस्तीपटूंच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता ब्रिजभूषण यांच्याविोरधात गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी यातून आम्हाला न्याय मिळणार आहे का असा सवाल कुस्तीपटू सत्यव्रत कडीयानने विचारला आहे. आता आमची कागदावरची लढाई सुरू झाली आहे. आमच्या प्रशिक्षकांचे काय मत आहे, ते विचारात घेऊन आम्ही पुढची दिशा ठरवणार असल्याची माहितीही त्याने दिली आहे.