नवी दिल्ली Vinesh Phogat :कुस्तीपटू विनेश फोगटनं आज तिला मिळालेला मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत केला. विनेश पुरस्कार परत करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयात जात असताना पोलिसांनी तिला रोखलं. अखेर तिनं 'कर्तव्य पथ' वर आपला पुरस्कार ठेवला आणि हात जोडून परत आली.
बजरंग पुनियाची पोस्ट : कुस्तीपटू बजरंग पुनियानं विनेश फोगटचे पुरस्कार परत करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. "कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यात हा दिवस येऊ नये. देशातील महिला कुस्तीपटू सर्वात वाईट टप्प्यातून जात आहेत," असं बजरंग म्हणाला. ऑलिम्पियन बॉक्सर विजेंदर सिंगनंही विनेश फोगटनं कर्तव्य पथावर ठेवलेल्या पुरस्कारांचा फोटो पोस्ट केला. विजेंदरनं आपल्या पोस्टमध्ये 'हे राम' असं लिहिलं आहे.
पुरस्कार परत करण्याची घोषणा केली होती : भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटनं २६ डिसेंबरला तिचा मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करण्याची घोषणा केली होती. यासह तिनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (X) वर पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून एक खरमरीत पत्रही लिहिलं होतं. "साक्षी मलिकनं कुस्ती सोडली. बजरंग पुनियानं त्याचं पद्मश्री परत केलं. त्यांना असं करण्यास का भाग पाडलं गेलं हे संपूर्ण देशाला माहीत आहे", असं विनेश म्हणाली होती. तसेच आता या पुरस्कारांचा तिरस्कार वाटू लागला आहे, असंही तिनं लिहिलं होतं.
WFI ची नवी संस्था निलंबित :साक्षी मलिकने कुस्ती सोडल्यानंतर आणि बजरंग पुनियानं पद्मश्री पुरस्कार परत केल्यानंतर WFI ची नवीन संस्था निलंबित करण्यात आली आहे. साक्षी मलिकच्या समर्थनार्थ समोर येत असताना कुस्तीपटूनं आपलं पद्मश्री परत करण्याची घोषणा केली होती. तसेच WFI च्या निलंबनानंतर, बलात्काराचा आरोप असलेले भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनीही कुस्ती सोडण्याचं वक्तव्य केलं आहे.
हे वाचलंत का :
- 'आता पुरस्कारांची किळस येतेय', बजरंग पुनिया पाठोपाठ विनेश फोगटनंही केली पुरस्कार परतीची घोषणा
- माझा कुस्तीशी आता काहीही संबंध नाही, संजय सिंह माझे नातेवाईक नाहीत - ब्रिजभूषण शरण सिंह