नवी दिल्ली :भाजपचे खासदार असलेले भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लावलेल्या लैंगिक छळ आणि विनयभंगाच्या आरोपांबाबत जनमत जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षण अहवालानुसार, बहुसंख्य भारतीयांना असे वाटते की या आंदोलनांचा भाजपवर नकारात्मक परिणाम होईल. या सर्वेक्षणात एक प्रश्न विचारण्यात आला होता की, कुस्तीपटू आणि ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यातील वादामुळे भाजपचे निवडणुकीत नुकसान होईल, असे तुम्हाला वाटते का? त्याच्या प्रतिसादात, सुमारे 47 टक्के प्रतिसादकर्त्यांना असा विश्वास आहे की यामुळे खूप नुकसान होईल, तर 17.6 टक्के लोकांना वाटते की याचा काही प्रमाणात परिणाम होईल. त्यातच आज कुस्तीपटूंना पत्रकार परिषद घेऊन आपण आंदोलनात माघार घेतली नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
भाजपला निवडणुकीत फटका बसेल -23 टक्क्यांहून कमी लोकांचा असा विश्वास आहे की कुस्तीपटूंच्या निषेधाचा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. सुमारे 54 टक्के एनडीए समर्थकांना असे वाटते की भाजपला निवडणुकीत फटका बसेल. कुस्तीपटूंनी विरोधी पक्षांचा उघड पाठिंबा घेतल्याने एनडीए समर्थक खूश नाहीत. कुस्तीपटूंनी विरोधी पक्षांचा पाठिंबा घेणे चुकीचे असल्याचे सुमारे 51 टक्के लोकांचे मत आहे. विरोधी पक्षांचे सुमारे 54 टक्के समर्थक ते योग्य मानतात. या मुद्द्यावर मतदारांची विभागणी स्पष्टपणे दिसून येते. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या आधारे दिल्ली पोलिसांनी सिंह यांच्याविरोधात अनेक एफआयआर नोंदवले. दुसरीकडे कुस्तीपटू साक्षी मलिक रेल्वे कार्यालयात दाखल झाल्याने अनेक अफवा उठल्या होत्या.