वाराणसी - उत्तर भारतीय पंचांगानुसार आषाढ मासाच्या मध्यम काळापासून श्रावण महिन्याची सुरुवात होते. तर महाराष्ट्रात श्रावण मासाची सुरुवात दीपअमावस्येपासून होते. यंदा मराठी पंचांगाप्रमाणे 28 जुलैपासून दीप अमावस्येनंतर मराठी भाषिकांचा श्रावण महिना सुरू होत आहे. तो 27 ऑगस्ट रोजी पिठोरी अमावस्येच्या दिवशी संपेल.
पूजेची विधी - श्रावण महिन्यात सकाळी ब्रह्ममुहुर्तावर उठून प्रात:स्नान करावे. यानंतर पांढरे वस्त्र किंवा सोहळे नेसून शिवलिंगाची पूजा करावी. सुरूवातीला उजव्या हातात तांब्याच्या लोट्यात शुद्ध जल, पांधरी फुले, गंध. पांढऱ्या अक्षता घेऊन प्रदोष व्रत करण्याचा संकल्प सोडावा. सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करून सायंकाळी स्नान करावे. यानंतर पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून प्रदोषवेळी शंकराची पूजा करण्यास सुरुवात करावी. शिवलिंगाला शुद्ध पाण्याने आणि दह्या-दुधाने अभिषेक घालून त्यावर चंदनाचा लेप लावावा. यानंतर भगवान शंकरांना यज्ञोपवित, सुगंधित द्रव्य, बेलपत्र, कन्हेर, धोत्रा, मंदार, ऋतूफल, नैवेद्य आदी अर्पण करावे. शंकराचे आवाहन करताना धूप दीप नैवेद्य दाखवून इच्छित मनोकामना सांगावी. शिवभक्तांनी पूजा करताना कपाळावर भस्म किंवा चंदनाचा टिळा लावावा. श्रावण महिन्यात प्राचीन किंवा मोडकळीस आलेल्या शिवालयांचा जिर्णोद्धार करणाऱ्यांवर भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात, अशी आख्यायिका आहे. शिवकृपा शिघ्र प्राप्त करण्यासाठी खालील पूजापद्धतीचाही अवलंब करता येईल.
शिवलिंगाचा अभिषेकः श्रावण महिन्यात देशातील सर्व मुख्य शिवालयात शंकराच्या पिंडीला पहाटे अभिषेक घातला जातो. शास्त्रात शिवलिंगाला स्नान घालण्याचे विविध प्रकार आहेत. उदा. दुग्धाभिषेक, शुद्ध जलाभिषेक, फळांच्या रसाने केला जाणारा अभिषेक, मधाभिषेक यासह अन्य अभिषेकाची प्रथा प्रचलित आहे. उत्तम आरोग्य आणि धनप्राप्तीसाठी भक्तांकडून शंकराच्या पिंडीला दुग्धाभिषेक आणि शुद्ध जलाभिषेक घातला जातो.