विश्वनाथ (आसाम) : जगात भारताची ओळख 'हत्तींचा देश' अशी आहे. हत्तीला इंद्राचे वाहन म्हटले जाते. त्यामुळे भारतात हत्तीला देवासमान दर्जा आहे. पूर्वीच्या काळी भारतीय राजे आपल्या पदरी 'शाही' हत्ती ठेवत असतं. ते त्यांच्या वैभवाचे प्रतिक मानले जात असे. इंग्रजांनाही भारतीय हत्तींचे विशेष कुतूहल होते. आता अशाच एका इंग्रजकालीन शाही हत्तीचे निधन झाले आहे. जगातील सर्वात वयोवृद्ध आशियाई हत्ती 'बिजुली प्रसाद' चे सोमवारी निधन झाले. मृत्यूच्यावेळी या हत्तीचे वय तब्बल 90 वर्षे होते. विशेष म्हणजे, एकेकाळी या हत्तीला ब्रिटिशांचे शाही आदरातिथ्य मिळाले होते.
ब्रिटिश साम्राज्याचा साक्षीदार होता : 'बिजुली प्रसाद' हा हत्ती आसाममधील सोनितपूर जिल्ह्यातल्या बेहाली चहाच्या मळ्यात राहत होता. तो भारतातील ब्रिटिश साम्राज्याचा साक्षीदार होता. अगदी आजपर्यंत इंग्रज 'बिजुली प्रसाद'ची नोंद ठेवत होते. या आधी बिजुलीला विश्वनाथमधील बारगाव चहाच्या मळ्यात ठेवण्यात आले होते. परंतु नंतर त्याला बेहाली चहाच्या मळ्यात आणण्यात आले.
विल्यमसन मॅगोर टी कंपनीने विकत घेतला होता : सुमारे 86 वर्षांपूर्वी विल्यमसन मॅगोर टी कंपनीने एक हत्ती विकत घेतला होता. इंग्रजांच्या ऑलिव्हर साहेबांनी त्या हत्तीचे नाव 'बिजुली प्रसाद' ठेवले. मॅगोर कंपनीच्या कुटुंबातील सदस्य बनलेला 'बिजुली' एकेकाळी कंपनीच्या अभिजाततेचे प्रतीक बनला होता. बिजुलीच्या आहारात दररोज २५ किलो तांदूळ, तितकेच कॉर्न आणि सेसी बीन यांचा समावेश होता. यासह 'बिजुली प्रसाद'ला केळींचा देखील नियमित खुराक दिला जायचा.