नवी दिल्ली :कोरोना विषाणूविरुद्ध जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम आपल्या देशात सुरू होणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सांगितले. कालच डीसीजीआयने देशातील दोन कोरोना लसींच्या अत्यावश्यक आणि मर्यादित वापराला परवानगी दिली आहे. त्यानंतर पंतप्रधानांनी आज देशातील संशोधकांचे कौतुक केले.
'मेड इन इंडिया' उत्पादनांची मागणी वाढली..
लसीकरण अभियान सुरू करण्यासाठी आपला देश सज्ज होतो आहे. यासाठी अविरत मेहनत घेतलेल्या संशोधकांचा आम्हाला अभिमान आहे, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. ते नॅशनल मेट्रोलॉजी कॉनक्लेव्हला संबोधित करत होते. देशात तयार झालेल्या उत्पादनांना आता संपूर्ण जग स्वीकारत आहे, तसेच 'मेड इन इंडिया' उत्पादनांची मागणीही दिवसेंदिवस वाढत आहे, असे ते यावेळी म्हणाले.
'आत्मनिर्भर भारत'साठी उत्पादनांची गुणवत्ता महत्त्वाची..
देशाला आत्मनिर्भर करायचे असल्यास, केवळ उत्पादनांची संख्याच नाही, तर गुणवत्ताही वाढवण्यावर आपण लक्ष द्यायला हवे. एका विकसीत समाजाचा पायाच संशोधन आणि त्या संशोधनांचे आर्थिक आणि सामाजिक परिणाम निश्चित करतात. आपल्याला जगभरात केवळ आपलीच उत्पादने असावीत असे आमचे म्हणणे नाही, मात्र जो कोणी आमची उत्पादने वापरेल त्या लोकांनी या उत्पादनांची प्रशंसा करायला हवी, असे मोदी यावेळी म्हणाले.
डीसीजीआयची दोन लसींना परवानगी..
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारने मोठा निर्णय घेत दोन लसींना मंजुरी दिली. तातडीच्या वापरासाठी ऑक्सफर्ड-अॅस्त्राझेनेकाच्या 'कोविशिल्ड' आणि भारत बायोटेक कंपनीच्या 'कोव्हॅक्सिन' लसीला औषध महानियंत्रक कार्यालयाने परवानगी दिली. कोरोनावरील तज्ज्ञ समितीने या दोन लसींची शिफारस डीसीजीआयकडे केली होती. त्यास रविवारी परवानगी मिळाली आहे. त्यामुळे भारतात लवकरच लसीकरण सुरू होणार आहे.
हेही वाचा :शेतकरी-सरकारमधील चर्चेची सातवी फेरीही निष्फळ; शुक्रवारी पुन्हा बैठक