जागतिक अन्नसुरक्षेच्या दृष्टीने मृदेचं अन्यसाधारण असं महत्व आहे. दरवर्षी ५ डिसेंबर रोजी 'जागतिक मृदा दिवस' (world Soil Day 2022) साजरा केला जातो. अलिकडच्या काळात झपाट्याने वाढतच चालेले शहरीकरण, सिमेंटचे रस्ते यामुळे मृदेची अधिक प्रमाणात झीज होत आहे. त्याचबरोबर शेतीमध्ये वापरण्यात येणारी भरमसाठ रासायनिक खते, शहरीकरणासाठी आणि उद्योगधंद्यांसाठी करण्यात येणारी जंगलतोड आणि इतर अनेक कारणांमुळे मृदेची झीज होण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरु आहे. तर केवळ एक इंच सुपीक मृदेचा थर तयार होण्यासाठी ८०० ते १००० वर्षांचा कालावधी लागतो. या सगळ्या बाबी लक्षात घेता मृदा संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, याची जाणिव ठेवुन कृती करायला हव्यात.
इतिहास (History) :मानवाच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम, पर्यावरणाचा ऱ्हास आणि अशा प्रकारच्या इतर अनेक कारणांमुळे मृदेची झीज मोठ्या प्रमाणावर होते आहे. त्यामुळे यासंदर्भात जागरुकता करण्याच्या दृष्टीने २०१३ साली सयुंक्त राष्ट्राच्या महासभेत ५ डिसेंबर हा 'जागतिक मृदा दिवस' साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला. फूड अॅन्ड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशन (FAO) अर्थात अन्न आणि कृषी संघटनेच्या वतीनं या दिवसाचे आयोजन केलं जातं. शेतकऱ्यांसोबतच सामान्य माणसांमध्येही मृदेसंबंधी जागरुकता करण्याचा उद्देश या सगळ्या गोष्टींमागे आहे.
थीम (Theme) :दरवर्षी मृदा दिवस साजरा करताना एक वेगळी थीम तयार केली जाते आणि वर्षभर त्या आधारे मृदा संवर्धनासाठी जागरुकता केली जाते. मातीतील पोषक तत्वांचे नुकसान ही मातीची ऱ्हास होण्याची एक मोठी प्रक्रिया आणि कारण आहे. यामुळे अन्न पोषणाला धोका निर्माण होतो आहे. त्यासाठी ही समस्या जगभरातील अन्न सुरक्षा आणि टिकाऊपणासाठी जागतिक स्तरावर सर्वात महत्त्वाची समस्या म्हणून ओळखली जाते. यावर्षीचा जागतिक मृदा दिवस 2022 च्या दिनाची थिम यावरचं आधारीत आहे.