महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

World Radio Day 2023 : सोशल मीडियाच्या धामधुमीत रेडिओने टिकवले आपले अस्तित्व, वाचा सविस्तर - यंत्र

रेडिओ म्हटले की, आपल्याला मनोरंजन करणारे साधन आठवते. आपल्या घरात, मोबाईलमध्ये, तर कधी आपल्या कारमध्ये प्रवास करत असताना आपल्याला सुंदर गाणी ऐकवणारे तर कधी वेगवेगळ्या पद्धतीची माहिती देणारे यंत्र म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. मात्र मागील शंभर वर्षात वेगवेगळी साधन उपलब्ध झाली तरी, लाडक्या रेडिओचे महत्त्व अद्याप कमी झाले नाही तर वाढले आहे. 13 फेब्रुवारी रोजी याच लाडक्या रेडिओचा दिवस साजरा केला जातो आहे.

Dr. Sandhya Mohite - Radio Day
डॉ. संध्या मोहिते - रेडिओ दिवस

By

Published : Feb 11, 2023, 8:27 PM IST

Updated : Feb 13, 2023, 6:59 AM IST

प्रतिक्रिया देतांना रेडिओ अभ्यासक डॉ. संध्या मोहिते

औरंगाबाद : आजच्या जगात आपण प्रत्येक दिवस उत्साहात साजरे करण्याचा प्रयत्न करतो. कधी मदर डे, फादर डे, फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाईन डे, डॉन डे असे वेगवेगळे दिवस आपण साजरे करतो. त्यात 13 फेब्रुवारी हा दिवस जगातील पटलावर 'रेडिओ दिवस' म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाने 2013 मध्ये या दिवसाला मान्यता दिली आहे. 1895 मध्ये रेडिओचा शोध लागला आणि नव्या क्रांतीचा उदय झाला. त्यावेळी त्याला 'फादर ऑफ रेडिओ' अस म्हटले जाऊ लागलं. अस असले तरी भारतात रेडिओ येण्यासाठी तब्बल 33 वर्षे लागली. भारतावर राज्य गाजवणाऱ्या इंग्रजांनी 23 जुलै 1927 रोजी पहिल्यांदा रेडिओ आणला. त्यावेळी मुंबई आणि कलकत्ता या दोन शहरातच तो ऐकायला मिळायचा. तर 1920 साली रेडिओचे व्यावसायिक युग सुरू झाल्याची माहिती अभ्यासिका डॉ. संध्या मोहिते यांनी दिली.



1950 पर्यंत घडले अनेक बदल :1920 ते 1950 हा रेडिओचा सर्वाधिक चांगला किंवा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. या काळात वेगवेगळे तंत्रज्ञान विकसित झाले. पुढे 1955 नंतर तर रेडिओ अनेकांच्या पसंतीस उतरले कारण, त्यावर असणारे वेगवेगळे कार्यक्रम लोकप्रिय झाले. लोक रेडिओपासून दूर राहणे पसंत करत नव्हते. त्यात 'सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम' म्हणजे लोकांचा जीव की प्राण झाला होता. टिव्ही येण्याआधी मनोरंजन आणि माहिती आदानप्रदान करण्यात रेडिओ एकमेव साधन म्हणून लोकप्रिय होते. पारतंत्र्याच्या काळात रेडिओच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला जात होता. विशेषतः नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी रेडिओचा वापर करत लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती अभ्यासिका डॉ. संध्या मोहिते यांनी दिली.



यंदाचं वर्ष हे शांती वर्ष : जगात रेडिओ दिवस साजरा करण्याची मान्यता 2013 मध्ये देण्यात आली. यंदा दहावे वर्ष साजरे केले जात आहे. दर वर्षी वेगवेगळ्या विषयांना प्राधान्य देत वर्ष साजरे केले जाते. युवकांवर, महिलांवर, पर्यावरण असे वैशिट्यपूर्ण विषय घेत हा दिवस साजरा केला जातो. यंदा रेडिओ आणि शांती अशी थीम घेऊन वर्ष साजरा करण्यात येत असल्याची माहिती डॉ संध्या मोहिते यांनी दिली. आज कालच्या जगात आधुनिकीकरण वाढले असले तरी, ताण-तणाव वाढला आहे. मन शांत ठेवण्यासाठी संगीत हा चांगला पर्याय म्हणून पाहिले जाते. त्यामुळे रेडिओच्या माध्यमातून मनाला शांत ठेवणारे असे गाणे यावर्षीचे वैशिष्ट्य असणार आहे. रेडिओ मनोरंजन नाही तर, आपल्या सुख दुःखात आपल्या सोबत असणारे साधन मानले जाते. त्यावर असणारे गाणे आपले नैराश्य दूर करते. म्हणून 13 फेब्रुवारी हा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार असल्याचे अभ्यासक डॉ संध्या मोहिते यांनी सांगितलं.



रेडिओ आजही महत्वाचा : आधुनिक काळात मनोरंजनाची वेगवेगळी साधने उपलब्ध झाली आहेत. त्यात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे रेडिओ वापरणाऱ्या लोकांची संख्या कमी होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. असे असले तरी रेडिओचा चाहतावर्ग आजही वाढत असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी घरात मोठा रेडिओ असायचा, मात्र काळात त्याचे स्वरूप बदलत गेले. आज प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये रेडिओ हा असतोच, इतकच नाही तर आपल्या गाडीमध्ये देखील त्याचा वापर दिवसभर केला जातो. वेगवेगळे गाणे त्याच्यावर असणाऱ्या वेगवेगळ्या चर्चा या नागरिकांना, चाहत्यांना आजही आकर्षक वाटतात. रेडिओ जॉकीचा आवाज भुरळ घालतो. त्यांच्या माध्यमातून देण्यात येणारी माहिती, आकडे याकडे चाहत्यांचे लक्ष असते. गाणे ऐकत असताना आपल्या आवडीची गाणी देखील सुचवण्याचे काम नागरिक करत असतात. त्यामुळेच रेडिओचे महत्त्व वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मन की बात कार्यक्रमासाठी रेडिओ हे साधन वापरतात. यातून रेडिओचा वापर आजही मोठ्या प्रमाणात होत आहे हे दिसून येते, अशी माहिती डॉ. संध्या मोहिते यांनी दिली.

हेही वाचा : World Day Of Social Justice : 'जागतिक सामाजिक न्याय दिन' का साजरा केला जातो?, काय आहे पार्श्वभूमी, जाणून घ्या सविस्तर

Last Updated : Feb 13, 2023, 6:59 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details