जयपूर :भारतीय अर्थव्यवस्थेनं गेल्या नऊ वर्षात मोठी झेप घेत जगातील पाचवी अर्थव्यवस्था होण्याचा बहुमान पटकावला आहे. त्यामुळे भारतात स्पर्धा आणि पारदर्शकता चांगलीच वाढली आहे. भारतात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी आहेत. त्यामुळेच जग भारताकडं मोठ्या आत्मविश्वासानं पाहत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं. जी20 च्या व्यापार आणि गुंतवणूक मंत्र्यांच्या बैठकीला आभासी पद्धतीनं संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.
भारतानं केला डिजिटायझेशनचा विस्तार :भारतानं डिजिटायझेशनचा विस्तार केला असून त्यामुळे नवनिर्मितीला चालना दिल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केलं. आम्ही रेड टेपवरुन रेड कार्पेटवर आल्याचंही त्यांनी सांगितलं. थेट परकीय गुंतवणुकीत आम्ही धोरणात्मक स्थिरता आणली आहे. येत्या काही वर्षात भारताला तिसरी जागतिक अर्थव्यवस्था बनवण्याचा आमचा निर्धार असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. जागतिक अनिश्चिततेनं जागतिक अर्थव्यवस्थेची परीक्षा घेतली आहे. त्यामुळे G20 चा सदस्य या नात्यानं आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं ही देशाची जबाबदारी असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.