नई दिल्ली World Food India 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय राजधानीतील प्रगती मैदानावर 'वर्ल्ड फूड इंडिया 2023' या मेगा फूड इव्हेंटच्या दुसऱ्या आवृत्तीचं उद्घाटन करतील. प्रगती मैदानातील भारत मंडपममध्ये सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. बचतगटांना बळकटी देण्याच्या उद्देशानं पंतप्रधान एक लाखाहून अधिक एसएचजी सदस्यांना प्रारंभिक भांडवली मदत वितरित करणार आहेत. एसएचजींना चांगले पॅकेजिंग आणि दर्जेदार उत्पादनाद्वारे बाजारपेठेत चांगले मूल्य मिळविण्यात मदत करेल, असं पंतप्रधान कार्यालयानं अधिकृत निवेदनात म्हटलंय. पीएम मोदी वर्ल्ड फूड इंडिया 2023 चा भाग म्हणून फूड स्ट्रीटचं उद्घाटनही करतील. यात प्रादेशिक खाद्यपदार्थ आणि राजेशाही खाद्यपदार्थांचा समावेश असेल.
200 हून अधिक शेफ होणार सहभागी : या मेगा इव्हेंटमध्ये 200 हून अधिक शेफ सहभागी होऊन पारंपारिक भारतीय पदार्थ तयार करतील. अशा परिस्थितीत हा एक अनोखा अनुभव असेल. या कार्यक्रमाचं उद्दिष्ट भारताला जगातील खाद्यपदार्थाच हब म्हणून प्रदर्शित करणं आणि 2023 हे बाजरीचं आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरे करणं आहे. ही इव्हेंट सरकारी संस्था, उद्योग व्यावसायिक, शेतकरी, उद्योजक आणि इतर भागधारकांना चर्चेत सहभागी होण्यासाठी, भागीदारी प्रस्थापित करण्यासाठी आणि कृषी-अन्न क्षेत्रात गुंतवणूकीच्या संधी शोधण्यासाठी नेटवर्किंग आणि व्यवसाय मंच प्रदान करेल.