अहमदाबाद World Cup 2023 Final : भारतीय क्रिकेट संघानं आतापर्यंत दोनदा एकदिवसीय विश्वचषकाचे विजेतेपद पटकावलं आहे. कपिल देव यांनी 1983 मध्ये टीम इंडियाला पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनवलं, तर 2011 मध्ये महेंद्रसिंह धोनीनं (Mahendra Singh Dhoni) टीम इंडियाला दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनवलं. रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना खेळला. भारताला पहिल्यांदाच विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांना या सामन्यात बोलावण्यात आलं नाही. यावरून आता वाद निर्माण झाला आहे.
कपिल देव यांना निमंत्रण दिलं नाही :'बीसीसीआय'नं सर्व माजी विश्वविजेत्या कर्णधारांना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सन्मानित करण्याची योजना आखली होती. माजी कर्णधारांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम पहिल्या डावाच्या विश्रांतीदरम्यान होणार होता. या कार्यक्रमासाठी बीसीसीआयनं कपिल देव यांना निमंत्रण दिलं नाही. तर कपिल देव 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार होते. यासाठी कपिल देव यांना बोलावण्यात आलं नसल्याचा दावा एका मीडिया रिपोर्टमध्ये केला होता. कपिल देव यांनी विश्वचषक फायनल दरम्यान एक वक्तव्य केलं. अंतिम सामन्यासाठी मला बोलावलं गेलं नाही, म्हणूनच मी तिथे गेलो नाही. 1983 च्या माझ्या संपूर्ण संघाला आमंत्रित केलं असतं तर ते अधिक आदरणीय ठरलं असतं. पण खूप काम आणि व्यस्ततेमुळे लोक मला फोन करायला विसरतात, अशी तिखट प्रतिक्रिया कपिल देव यांनी दिली.
तेव्हा त्यांनी देशाला विश्वविजेता बनवलं : कपिल देव यांच्या या वक्तव्यानंतर वाद आणखी वाढला आहे. कपिल देव हे 1983 चे विश्वविजेता माजी कर्णधार आहेत. त्यांना अंतिम सामन्यासाठी न बोलावणं अत्यंत अपमानास्पद आहे. त्यांनी अशा वेळी देशाला विश्वविजेता बनवलं, जेव्हा टीम इंडियाकडे क्रिकेट खेळण्यासाठी चांगली सोय नव्हती. तसेच भारतीय क्रिकेट बोर्डाकडे पैसाही नव्हता. आता या माजी कर्णधारासोबत 'बीसीसीआय'ची अशी वागणूक निषेधार्ह आहे, अशा प्रतिक्रिया आता सोशल मीडियाच्या माध्यमातून उमटत आहेत.
कपिल देव यांना आमंत्रण नाही : भारत-ऑस्ट्रेलिया फायनलसाठी माजी क्रिकेटपटूंसह अनेक मोठ्या व्यक्तींना आमंत्रित करण्यात आलं होतं. सचिन तेंडुलकर, शाहरुख खान, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण यांच्यासह अनेक मोठे चेहरे मैदानावर टीम इंडियाला पाठिंबा देताना दिसले होते. पण माजी दिग्गज खेळाडू कपिल देव म्हणतात की, त्यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते.