महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 10, 2022, 5:38 PM IST

Updated : Oct 10, 2022, 6:42 PM IST

ETV Bharat / bharat

अद्भूत रामनामी समाज, त्यांची परंपरा देखील आहे अद्वितीय, संपूर्ण शरीरावर गोंदतात रामनाम

लोक धार्मिक पुस्तकांमध्ये धर्माचा आधार शोधतात, मंदिरांमध्ये ते श्रद्धेने जातात आणि त्यांच्या-त्यांच्या श्रद्धेनुसार धर्मानुसरण करतात. परंतु येथे अशा एका पंथाची कथा आम्ही सांगणार आहोत, ज्यांनी आपल्या संपूर्ण शरीरावर त्यांचा धर्म कोरलेला आहे. प्रस्थापित उच्चवर्णीय हिंदूंच्या कट्टर धार्मिक प्रथांचा निषेध म्हणून सुमारे 130 वर्षांपूर्वी ही प्रथा सुरू झाली.

अद्भूत रामनामी समाज
अद्भूत रामनामी समाज

रायपूर (छत्तीसगड) - रामनामी हा असा एक संप्रदाय आहे ज्यातील लोक सर्व शरीरावर भगवान रामाचे नाव गोंदतात. या अनोख्या पंथाची स्थापना 1890 मध्ये परशुराम यांनी केली होती. कारण उच्चवर्णीय हिंदूंनी खालच्या जातीतील लोकांना मंदिरात प्रवेश नाकारला होता.

रामनामी पंथ -महानदीच्या काठावर छत्तीसगडमधील तीन जिल्ह्यांमध्ये हा समाज पसरलेला आहे. ही नदी राज्याची जीवनरेखा आहे. सुमारे सहा लाख लोकसंख्या असलेला रामनामी पंथ हा शतकानुशतके प्रचलित असलेल्या धार्मिक जातिव्यवस्था आणि सांप्रदायिक भेदभावाच्या निषेधाचे प्रतीक आहे.

गावातील उच्चवर्णीय लोकांनी 1890 मध्ये आम्हाला मंदिरात जाण्यापासून रोखले होते. आम्ही देवपूजा करू शकत नव्हतो. तेव्हा आमचे गुरू परशुरामजींनी याला विरोध केला. त्यांनी संपूर्ण शरीरावर राम हे नाव कोरले. तेव्हापासून ही परंपरा चालत आली आहे. जे असे करतात त्यांना रामनामी म्हणतात, रामनामी समाजाचे धार्मिक नेते गुला राम यांनी हे सांगितले.

अद्भूत रामनामी समाज

राम सर्वत्र वास करतात -तथापि, धर्मगुरू राम साई बघेल वेगळीच गोष्ट सांगतात, भगवान राम सर्वत्र वास करतात. जेव्हा परकीय आक्रमकांनी भारतातील मंदिरांची नासधूस करून त्यांचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला तेव्हा समाजातील परशुरामजींनी प्रथम संपूर्ण शरीरावर रामाचे नाव कोरले. कालांतराने समाजातील इतर लोकांनीही आपल्या शरीरावर रामाचे नाव कोरायला सुरुवात केली. रामनामी संप्रदाय अनेक बाबींमध्ये उदारमतवादी आणि लोकशाहीवादी आहे. रामनामी समाजात जन्मावर कोणतेही बंधन नाही. या पंथातील कोणाशीही लग्न केल्यास समाज इतर पंथातील महिलांनाही स्वीकारतो, असे ते पुढे म्हणाले.

रामाच्या भजनात गुंगून गेले -जांजगीरच्या नवागढला लागून असलेल्या खापराडीह गावात राहणाऱ्या हिरोडीबाई या महिलेने सांगितले की, लग्नाच्या आधी मी रामनामी नव्हते. लग्नानंतर, माझ्या सासू-सासऱ्यांना पाहून माझ्या डोक्यावर रामाचे नाव कोरले. त्यानंतर, मी घुंगरू आणि रामनामाची ओढनी वापरण्यास सुरुवात केली. याचबरोबर, मी रामाच्या भजनात गुंगून गेले. हिरोडीबाईंची सून ज्योती देवी यांनी सांगितले की, मी यापूर्वी कधीही एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर रामाचे नाव लिहिलेले पाहिले नव्हते. पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झाले, पण माझ्या सासरच्या घरी राहून मलाही या वातावरणाची सवय झाली. माझ्या संपूर्ण शरीरावर देवाचे नाव लिहिलेले नसले तरी माझ्या कपाळावर राम लिहिलेले आहे.

रामनामी समाजाचे वेगळेपण -त्यांच्या पोषाखावरुन रामनानी समाजाचे वेगळेपण दिसून येते. रामनामी कपडे आणि ओढणी किंवा घूंघट ही या समाजाची ओळख आहे. त्यांची धार्मिक-सामाजिक कामे संतांसारखीच असतात. ते जाड सुती पांढरे कपडे आणि उपर्ण किंवा ओढणी-घुंघट वापरतात. तो त्यांचा पारंपारिक पोशाख आहे. वर जे उपर्ण घेतले जाते त्याला ओधनी म्हणतात. काही पुरुष या कापडाचा शर्ट, कुर्ता किंवा बनियन देखील शिवतात. स्त्रिया देखील त्याचप्रकारे बुरखा घालतात. या ओधानीवर रामाचे नाव काळ्या रंगात लिहिलेले असते.

मोराचा मुकुट महत्त्वाचा -रामनामी समाजात मोराचा मुकुट महत्त्वाचा मानला जातो. असे म्हटले जाते की जे मुकुट परिधान करतात ते निःस्वार्थ किंवा वासना त्यागाचे प्रतिक मानले जातात. सर्वसामान्य रामनामी हा मुकुट केवळ सामूहिक स्तोत्राच्या कार्यक्रमावेळी परिधान करतात. परंतु ज्या धार्मिक लोकांनी आपले कौटुंबिक जीवन सोडले आहे, ते नेहमी मोराचा मुकुट घालतात. फक्त झोपताना तो काढून टाकतात. एका पातळ पांढऱ्या कपड्यात गुंडाळून पूजेच्या ठिकाणी तो मुकुट ठेवतात. स्त्री आणि पुरुष दोघेही मोराचा मुकुट घालतात.

मंत्रमुग्ध करणाऱ्या लयीत भजन -रामनमी समाजात घुंगरूंना खूप महत्त्व आहे. हे लोक भजन करताना फक्त घुंगरू वाजवतात. पायांना घुंगरू बांधून, डोलतात आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या लयीत भजन गातात. जमिनीवर विशिष्ठप्रकारे ते तालबद्ध पद्धतीने घुंगरू वाजवतात. पितळेचे घुंगरू कापसाच्या बारीक धाग्यात गुंफून त्यांचे छोटे पायल बनवतात.

कपाळावर रामाचे नाव -समाजातील लोक सांगतात, रामनामी समाज आपल्या मुलांच्या जन्मानंतर सहाव्या दिवशी 'छठी' साजरी करतात आणि त्या दिवशी मुलाच्या कपाळावर रामाचे नाव कोरले जाते. मुलावर धर्माचा हा पहिला ठसा आहे आणि नंतर मूल पाच वर्षांचे झाल्यावर त्याच्या संपूर्ण शरीरावर कधीही रामनाम कोरले जाऊ शकते. काही लोक लग्नाच्यावेळी असे करतात.

मुलाच्या कपाळावर सहाव्या दिवशीच राम नाव लिहिण्याची सक्ती मात्र नसते. मुलगी असो वा मुलगा, सहाव्या दिवशी राम नावाची पूजा मात्र केली जाते. घरातील सदस्यांची इच्छा असल्यास ते स्वेच्छेने हे नाव कोरू शकतात. भगवान राम लिहिले जाते. नाव कोरायचे की नाही हे ठरवण्याचा एकमेव अधिकार संबंधित मुलाकडे असतो, असे एका धार्मिक नेत्याने सांगितले.

गोंदण्यासाठी विशेष शाई -विशेष म्हणजे शरीरावर रामनाम गोंदणे आजकाल सोपे राहिलेले नाही. नाव लिहिण्याच्या प्रक्रियेसाठी केवळ तज्ञांच्या हातांची आवश्यकता नाही तर नाव गोंदण्यासाठीची शाई देखील अद्वितीय अशाच खास प्रकारे तयार केली जाते. प्रामुख्याने काजळी मातीच्या भांड्यात गोळा केली जाते आणि ती पाण्यात मिसळली जाते आणि नंतर ती बाभळीच्या सालीसह उकळली जाते. त्यापासून तयार केलेला घट्ट द्रव नाव गोंदण्यासाठी विशेष शाई म्हणून वापरला जातो.

नाव गोंदण्यासाठी तज्ज्ञाचीही गरज आहे. एका सुईच्या टोकाला तीन सुया एकत्र बांधल्या जातात. मग ‘राम’ टॅटू कोरण्यासाठी सुया नैसर्गिक शाईत बुडवल्या जातात. ही एक कष्टप्रद प्रक्रिया आहे आणि त्यासाठी तज्ञांच्या हाताची गरज आहे. त्यामुळे तरुण पिढीला संपूर्ण शरीरावर नाव कोरण्यात रस नाही, असे त्यांच्या नेत्याने सांगितले. तरुण पिढी जेव्हा मुलाखती आणि नोकऱ्यांना जाते तेव्हा त्यांच्यासाठी समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे ते त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ते पुढे म्हणाले.

आचार्य कार्तिक राम -रामनामी समाजाचे आचार्य कार्तिक राम आहेत. त्यांचे वय ७० वर्षांपेक्षा जास्त आहे. ते जन्मापासूनच अंध आहेत. तरीही ते जेव्हा-जेव्हा समाजात येतात तेव्हा त्यांना पाहण्यासाठी लोक जमतात. कारण त्याच्या संपूर्ण शरीरावर राम हे नाव गोंदलेले आहे. मी लहानपणापासून अंध आणि निरक्षर आहे. यानंतरही प्रभू रामाच्या कृपेने मला संपूर्ण रामायण तोंडपाठ आहे. मी केवळ रामायणच गातो असे नाही, तर मी भाष्यकारही आहे. माझ्या समाजाच्या पहिल्या गुरूंचाही आशीर्वाद आहे, असे ते म्हणाले.

रामनामी समाजाच्या अनोख्या परंपरांचे जतन करण्यासाठी सरकारनेही पावले उचलण्याची गरज आहे. या पंथाची माहिती शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट केली जावी जेणेकरुन संप्रदाय सोडून इतर लोकांना देखील त्यांच्याबद्दल माहिती होईल आणि त्यांच्यापासून प्रेरणा मिळेल, असे इतिहासकार रामेंद्रनाथ मिश्रा म्हणाले.

जातीभेद संपलेला नाही याची खंत -इतिहासकार रामेंद्रनाथ मिश्रा पुढे म्हणाले की, रामनामी समाजाचा जन्म जातिभेदाविरुद्धच्या संघर्षातून झाला आहे. ज्यांनी आपला स्वाभिमान जिवंत ठेवला त्यांची ही जीवंत कथा आहे. पण या समाजाने स्वीकारलेली पद्धत आता जुनी झाली आहे आणि ती पुढे नेण्यास नवीन पिढी पूर्णपणे असमर्थ आहे. त्यांच्यापुढे अनेक अडचणी आहेत. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 130 वर्षांनंतरही छत्तीसगडमध्ये जातीय भेद आणि जातीय भेदभावाच्या विरुद्ध सुरू झालेली ही चळवळ अजूनही जीवंत आहे. जातीभेद संपलेला नाही याची खंत मात्र कायम आहे.

Last Updated : Oct 10, 2022, 6:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details