नवी दिल्ली :काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चेत भाग घेत भाषण केलं. सोनिया गांधी यांनी 'नारी शक्ती वंदन कायदा 2023' विधेयकाला पाठिंबा दर्शवत, त्याची त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी केली. त्या म्हणाल्या, विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी होणारा विलंब हा देशातील महिलांवर घोर अन्याय करणारा आहे. त्यामुळं कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलयं.
विधेयकाचं काद्यात रुपांतर करा : मी नारी शक्ती वंदन विधेयकाच्या 2023 च्या समर्थनार्थ उभी आहे. या विधेयकाचे रुपांतर कायदा होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचं महिलांकडून सांगण्यात येत आहे. या विधेयकाचं तत्काळ कायद्यात रुपांतर व्हावं, अशी आमची मागणी आहे. विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी होणारा विलंब हा देशातील महिलांवर घोर अन्याय करणारा आहे. सरकारनं या विधेयकाचं कायद्यात रुपांतर करावं असं त्या संसदेत बोलताना त्या म्हणाल्या. त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर झाली पाहिजे याकडे अधिक लक्ष देण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली.
जात जनगणना करण्याची मागणी :तसंच इतर मागासवर्गीय/अनुसूचित जाती (OBC/SC) समुदायातील महिलांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी जात जनगणना करण्याची मागणी सोनिया गांधी यांनी यावेळी बोलताना केलीय. लोकसभेतील भाषणापूर्वी सोनिया गांधी म्हणाल्या की, हे राजीवजींचं (गांधी) स्वप्न होतं. माझ्या आयुष्यातील हाही एक भावनिक क्षण असल्याचं सोनिया गांधी यांनी लोकसभेत सांगितलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांचं प्रतिनिधित्व निश्चित करण्यासाठी प्रथमच घटनादुरुस्ती राजीव गांधी यांनी केल्याचं त्या म्हणाल्या.