बेंगळुरू: सर्जापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन बहिणींना त्यांच्या राहत्या घरी विवस्त्र करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याहून धक्कादायक म्हणजे पोलिसांनी दोन दिवस तक्रार घेण्यास नकार दिल्याचा आरोप होत आहे. जनक्षोभानंतरच तक्रार दाखल झाली.
पोलिसांनी बुधवारी या हल्ल्याप्रकरणी आरोपी रामकृष्ण रेड्डी आणि सुनील कुमार यांना अटक केली. ही घटना अणेकल तालुक्यातील दोड्डाबोम्मासंद्र येथे घडली. रामकृष्ण रेड्डी आणि सुनील कुमार आणि इंद्रम्मा यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. तिसर्या आरोपीला अद्याप अटक करणे बाकी आहे.
तक्रारीनुसार, पीडितांपैकी एकाने दोड्डाबोम्मासंद्राजवळील नेरीगा गावातील रहिवासी रामकृष्ण रेड्डी यांच्याकडून तिच्या मुलांच्या शिक्षणासाठी 30 टक्के व्याजाने 1 लाख रुपये कर्ज घेतले होते. तथापि, तिला कर्जाची संपूर्ण रक्कम एकाचवेळी परत करण्यास सांगण्यात आले. आपली जमीन विकल्यानंतर पीडितेने कर्जाची रक्कम फेडली जाईल, असा करार केला होता. असे असतानाही आरोपींनी त्यांच्या राहत्या घरात घुसून मारहाण करून पिडीतांना विवस्त्र केले.
या घटनेसंदर्भात त्यांनी सर्जापूर पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र, इन्स्पेक्टर राघवेंद्र इमब्रापूर यांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचा आरोप आहे. इन्स्पेक्टरने पीडितांना आरोपींशी बोलणी करून तोडगा काढण्यास सांगितले होते. दरम्यान, मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिस आणि आरोपींविरोधात जनक्षोभ निर्माण झाला. अखेर पोलिसांनी पीडितांना पोलिस ठाण्यात बोलावून मंगळवारी रात्री तक्रार दाखल केली.
हेही वाचा - Naveen Jindal: आता तुझा नंबर! भाजपचे माजी मीडिया प्रभारी नवीन जिंदाल यांना जीवे मारण्याची धमकी