चंदीगढ : आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड निघेल असा इशारा शेतकरी संघटनांनी दिला होता. त्यानंतर आज हरियाणाच्या जिंदमध्ये शेतकरी महिलांनी राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टर चालवत, या 'किसान परेड'चा सराव केला.
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये आतापर्यंत चर्चेच्या सात फेऱ्या पार पडूनही, अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळेच, आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर येत्या २६ जानेवारीला दिल्लीमधील प्रजासत्ताक दिनाची परेड झाल्यानंतर, आम्ही ट्रॅक्टर परेडचे आयोजन करु असा इशारा शेतकरी संघटनांनी तीन जानेवारीला दिला होता.
'ट्रॅक्टर परेड'साठी शेतकरी महिला सज्ज; महामार्गावर केला सराव सहा जानेवारीला शक्तीप्रदर्शन..
सध्या आम्ही सहा जानेवारीला दिल्लीमधील कुंडली-मानेसर महामार्गावर आम्ही ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहोत. मात्र त्यानंतरही सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर २६ जानेवारीला दिल्लीच्या राजपथवर लाखो ट्रॅक्टर परेड करतील, असा इशारा या महिलांनी यावेळी दिला.
थंडी-पावसातही सुरुये आंदोलन..
एका महिन्याहून अधिक काळापासून शेतकऱ्यांचे दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरू आहे. याठिकाणी ४० प्रमुख शेतकरी संघटनांसह देशभऱातील सुमारे ५०० शेतकरी संघटनांचे हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. सध्या दिल्लीमध्ये थंडीची लाट आली असून, काही ठिकाणी पाऊसही सुरू आहे. मात्र, अशा हवामानातही आंदोलनकर्ते शेतकरी सीमांवरती ठाण मांडून बसले आहेत. कितीही विपरीत परिस्थिती असली, तरी आम्ही मागे हटणार नाही अशी या शेतकऱ्यांची भूमीका आहे.
हेही वाचा :कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आणखी २० रुग्ण आढळले; देशभरात एकूण ५८ जणांना लागण