प्रतापगढ (राजस्थान) :Woman Naked Parade : राजस्थानच्या प्रतापगढ जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका आदिवासी महिलेला तिच्या पती आणि सासरच्या लोकांनी मारहाण केली. त्यानंतर नग्न करून तिची धिंड काढण्यात आली. आता या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय.
व्हिडिओ समोर आल्यानंतर घटना उघडकीस : शुक्रवारी संध्याकाळी या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक, पोलिस महानिरीक्षक आणि संबंधित पोलिस ठाण्याचे अधिकारी ताबडतोब गावात पोहोचले. डीजीपी उमेश मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील धारियावाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निचलकोटा गावात गुरुवारी ही घटना घडली.
विवस्त्र करत एक किलोमीटरपर्यंत धिंड काढली : पीडितेचं वर्षभरापूर्वी लग्न झालं होतं. मात्र ती गावातीलच दुसऱ्या पुरुषासोबत राहत होती, असा तिच्यावर आरोप आहे. या घटनेचा निषेध करताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी, 'आरोपींना लवकरात लवकर तुरुंगात टाकलं जाईल', असं सांगितलं. घटनेची माहिती देताना डीजीपी म्हणाले, 'महिलेच्या सासरच्या लोकांनी हा जघन्य गुन्हा केला. त्यांनी तिचं अपहरण करून तिला त्यांच्या गावी नेलं. त्यानंतर तिच्या पतीनं तिला मारहाण केली. त्यांनी तिला विवस्त्र करत गावात सुमारे एक किलोमीटरपर्यंत तिची धिंड काढली', असं त्यांनी सांगितलं.