हैदराबाद : सोशल माध्यमावरील साडीच्या मोहापायी महिलेने लाखो रुपये गमावल्याने खळबळ उडाली. ही घटना हैदराबादमधील एलबी नगर परिसरात उघडकीस आली. सोशल माध्यमावर आवडलेली साडी या महिलेने ऑर्डर केली होती. याप्रकरणी पीडित महिलेने एलबी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या बँक खात्यावर सायबर फसवणूक करणाऱ्या भामट्यांची नजर असल्याचे त्यावरुन दिसून आले. नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सोशल माध्यमावर पाहिली होती साडी :एलबी नगर परिसरातील महिलेने सोशल माध्यमावर एक आकर्षीत साडी पाहिली होती. त्यामुळे महिलेने ही साडी ऑर्डर केली. ऑर्डर करताना महिलेने साडी कॅश ऑन डिलीव्हरी ऑर्डर केली होती. मात्र आलेली साडी आणि सोशल माध्यमावर असलेल्या जाहिरातीतील साडी यात खूप फरक होता. त्यातही मागवलेली साडी ही डॅमेज होती. त्यामुळे महिलने तात्काळ याबाबत डिलिव्हरी बॉयकडे याबाबत तक्रार केली. मात्र डिलिव्हरी बॉयने महिलेकडे ऑनलाईन तक्रार करायला सांगितले.
पैसे खात्यात जमा होण्यासाठी दिली लिंक :साडी फाटलेली असल्याने महिलेने याबाबत ऑनलाईन तक्रार दाखल केली. त्यानंतर या महिलेने कॉलसेंटरकडे याबाबत तक्रार केली. कॉलसेंटरवरील बोलणाऱ्या महिलेने पैसे जमा होण्यासाठी या महिलेला एक लिंक पाठवली होती. आपल्या साडीचे दिलेले पैसे परत मिळतील या आशेने पीडित महिलेने कॉलसेंटरवरील व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर महिलेने या लिंकला क्लिक करुन आपली माहिती भरली.
पैसे जमा होण्याऐवजी लागला चुना : सोशल माध्यमावर पाहिलेल्या साडीच्या मोहाने महिलेने साडी ऑर्डर केली होती. मात्र फाटकी साडी आल्याने तिने पैसे परत मिळावे म्हणून तक्रार दाखल केली. महिलेला कॉल सेंटरवरील व्यक्तीने पाठवलेल्या लिंकवर सगळी माहिती आणि बँकेचे डिटेल्स भरायला सांगितले. आपले पैसे लवकरच आपल्या खात्यात जमा होतील, या भाबड्या आशेपायी या महिलेने त्या लिंकवर सगळी माहिती भरली. त्यानंतर पीडित महिलेला एक पासवर्ड आला, सदर पासवर्ड त्या महिलेने त्या लिंकमध्ये टाकला. त्यामुळे महिलेच्या खात्यात पैसे जमा होण्याऐवजी कट झाले. थोड्या वेळात महिलेने ऑनलाईन पैसे जमा झाले की नाही, याबाबतची खात्री केली. मात्र ऑनलाईन स्टेटस चेक केल्यानंतर महिलेला धक्काच बसला. त्या महिलेच्या खात्यात पैसे जमा होण्याऐवजी ते कट झाल्याचे दिसून आले.