नवी दिल्ली - दिल्लीतील शाहदरा जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी घृणास्पद घटना घडली आहे. शाहदरा येथे परस्पर वैमनस्यातून एका तरुणीचे अपहरण करून चार जणांनी तिच्यावर बलात्कार ( Delhi Rape Case ) केल्याची घटना घडली आहे. तर आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी बलात्कारानंतर तरुणीचे मुंडन करून तोंडाला काळे फासले आणि चप्पलचा हार घालून वस्तीत फिरवले. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, पीडित तरुणी (20) शाहदरा येथील कस्तुरबा नगर भागातील रहिवासी आहे. काही वर्षांपूर्वी तिची 12-13 वर्षांच्या एका मुलाशी मैत्री झाली होती. हळुहळु त्यांची मैत्री वाढत गेली आणि घरच्यांना याची माहिती झाली. पीडित मुलगी 16 वर्षांची असताना तिच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसरीकडे लावले. मात्र, त्यानंतरही दोघांची भेट सुरूच होती. आता पीडितेला एक मूलही आहे.
काही दिवसांपूर्वी पीडित तरुणीने संबंधित मुलाला भेटण्यास नकार दिला आणि आपण येथून पुढे कधीच भेटायचे नाही, असे सांगितले. यावर संबंधित मुलाने (16) रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. त्याचा मृत्यू झाल्यापासून मुलाचे कुटुंबीय मुलाच्या मृत्यूसाठी पीडितेला जबाबदार धरत होते. तेव्हापासून कुटुंबीय पीडितेचा वेगवेगळ्या प्रकारे छळ करत होते. पीडितनेच मुलाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते. त्यामुळेच तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप मृत तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे.