कौशांबी (यूपी):ही घटना यूपीतील करारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. म्योहर गावातील रहिवासी श्रीचंद रायदास यांची पत्नी नीता देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला संध्याकाळी म्योहर बाजारातून भाजी घेऊन पायी परतत होती. निर्जन रस्त्यावर एका इसमाने तिच्या पाठीवर मागून वार करत गळ्यातील मंगळसूत्र हिसकाविण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरड केली असता आरोपीने तिचे तोंड बंद करण्याचाही प्रयत्न केला. नेमके याच दरम्यान चोराचे बोट महिलेच्या तोंडात अडकले. त्याने ते काढण्याचा प्रयत्न केला. पण, तो अपयशी ठरला. अखेर धाडस दाखवत त्याने आपले बोट कापले. आरोपीचे बोट महिलेच्या तोंडात राहिले. बोट गमावल्याने आरोपी थरथरू लागला. इतर गावकरी घटनास्थळी पोहोचेपर्यंत रक्तबंबाळ झालेल्या आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.
तोडलेले बोट घेऊन गाठले पोलीस ठाणे :आरोपीने चेन स्नॅचिंग करताना महिलेच्या चेहऱ्याला ओरबडून गंभीर दुखापत केली. यानंतर शनिवारी महिलेने आरोपीचे तोडलेले बोट घेऊन पोलीस ठाणे गाठले. महिलेच्या हातातील बोट कापलेले पाहून पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. महिलेने पोलिसांना संपूर्ण घटना सांगितली तेव्हा सर्वांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले. पीडित महिलेने पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी पत्रात म्हटले आहे की, तिचे सोन्याचे लॉकेट, तोरड्या आणि ४ हजार रुपये हिसकावून आरोपी फरार झाला. सीओ मंझनपूर योगेंद्र कृष्ण नारायण यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक महिला तुटलेले बोट घेऊन करारी पोलिस ठाण्यामध्ये पोहोचली होती. अज्ञात व्यक्तीने तिच्यावर हल्ला केल्याचे तिने सांगितले. महिलेने स्वत:च्या बचावासाठी आरोपीचे बोट तोडून वेगळे केले. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेतला जात आहे.