नवी दिल्ली : सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणाऱ्या वाढत्या महागाईसाठी कारणीभूत ठरणारा सर्वात मोठा घटक असलेल्या पेट्रोल, डिझेलचा जीएसटीच्या कक्षेत समावेश आज केला जाण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये होणाऱ्या जीएसटी परिषदेत याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या परिषदेकडे लागले आहे. 18 नोव्हेंबर 2019 नंतरची जीएसटी परिषदेची ही पहिलीच प्रत्यक्ष परिषद आहे.
इंधन दरवाढीपासून दिलासा मिळणार?
सूत्रांच्या माहितीनुसार, पेट्रोल, डिझेल अशा इंधनांना जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा मुद्दा आजच्या जीएसटी परिषदेच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे या बैठकीत जीएसटी विषयी निर्णय घेतला जाऊ शकतो. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याशिवाय राज्यांना देण्यात येणारा जीएसटी मोबदला व कोरोनाशी निगडीत वस्तुंवरील जीएसटी दराबाबत विचार केला जाण्याची शक्यता आहे.
जीएसटीची ही 45 वी बैठक आहे. मागील जीएसटी परिषद ही 12 जूनला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झाली होती. रेमडेसिवीर औषधांवरील, वैद्यकीय ऑक्सिजन व ऑक्सिजन कन्स्ट्रेटवरील जीएसटी करात यावेळी कपात करण्यात आली होती. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 71वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यातच आज पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आल्यास इंधनाचे दर निम्म्याने कमी होती. हे मोदींच्या वाढदिवसाचे गिफ्ट असेल.
हेही वाचा -नरेंद्र मोदी @71! राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींसह दिग्गजांकडून वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव