चेन्नई/नवी दिल्ली: तामिळनाडू काँग्रेस पक्षाच्या एका नेत्याने गुजरात सुरत न्यायालयाच्या न्यायाधीशांची 'जीभ कापण्याची' धमकी दिली आहे. ज्यांनी 2019 च्या गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींना दोषी ठरवले आणि त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. 'सर्व चोरांची नाव मोदी का आहेत' या विधानासाठी 23 मार्च रोजी कर्नाटकातील कोलार येथे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी दोषी आढळले. त्यानंतर लोकप्रतिनिधी कायद्याच्या तरतुदीनुसार त्यांना लोकसभेतून खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले.
त्यांना तुरुंगात टाकणारे तुम्ही कोण? : तामिळनाडूतील काँग्रेसचे नेते मणिकंदन यांनी न्यायमूर्ती एच वर्मा यांना काँग्रेस सत्तेवर आल्यावर त्यांची जीभ कापून टाकू, अशी धमकी दिली आहे. ते म्हणाले, '23 मार्च रोजी सुरत न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आमचे नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. न्यायमूर्ती एच वर्मा, काँग्रेस सत्तेवर आल्यावर तुमची जीभ कापून टाकू. त्यांना तुरुंगात टाकणारे तुम्ही कोण?' असही ते म्हणाले आहेत.
मणिकंदनविरुद्ध दिंडीगुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : काँग्रेस पक्षाच्या एसटी/एससी शाखा तामिळनाडूच्या दिंडीगुलमध्ये राहुल गांधींना खासदार म्हणून अपात्र ठरवल्याबद्दल निषेध करत होते, तेव्हा पक्षाचे जिल्हा प्रमुख मणिकंदन यांनी सुरत न्यायालयाच्या न्यायाधीशाविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केली. भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) तीन कलमान्वये मणिकंदनविरुद्ध दिंडीगुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.