हैदराबाद : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू आहे. दररोज नव्या रुग्णसंख्येची आणि मृतांची विक्रमी आकडेवारी समोर येत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे सुमारे 2 लाख 17 हजार नवे रुग्ण आढळले तर 1185 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोना मृतांची संख्या सातत्याने वाढत असली तरी मृतांच्या आकडेवारीवरच आता संशय व्यक्त केला जात आहे. ईटीव्ही भारत ने या आकडेवारीवरील ग्राऊंड रिपोर्टच्या आधारे तीन महत्वाचेप प्रश्न उपस्थित केले आहेत. तत्पूर्वी देशातील तीन राज्यांमधील मृतांची सरकारी आकडेवारी आणि स्मशानभूमीच्या आकडेवरील तफावत बघितली तर या आकडेवारीविषयीचा संशय आणखीनच बळावतो.
मध्य प्रदेश
मध्य प्रदेशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 10,166 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 53 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशात सरासरी इतकेच रुग्ण समोर येत आहेत. मात्र मृतांच्या आकडेवारीवर संशय व्यक्त केला जात आहे. मध्य प्रदेशात सरकारी आकडेवारीनुसार 12 एप्रिल रोजी 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर भोपाळमधील स्मशानभूमीच्या आकडेवारीनुसार तेथे याच दिवशी 58 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याच दिवशी छिंदवाडामध्येही 37 हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन्ही शहरांतच या दिवशी 74 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ही आकडेवारी त्या दिवशीच्या सरकारी आकडेवारीपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे ही राज्यातील केवळ दोनच स्मशानभूमीतील आकडेवारी आहे.
दिल्ली
राजधानी दिल्लीतही कोरोनाचा कहर सुरू आहे. 24 तासांत दिल्लीत 16699 नवे रुग्ण आढळले, तर 112 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिल्लीत सध्या 54,309 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. राजधानीतही मृतांच्या आकडेवारीविषयी संशय व्यक्त केला जात आहे. दिल्लीत 12 एप्रिलच्या आकडेवारीनुसार दक्षिण दिल्ली महापालिकेतील स्मशानभूमींमध्ये 43 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर दिल्ली महापालिकेच्या स्मशानभूमीत 40 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन्ही महापालिकांच्या स्मशानभूमीत या दिवशी 83 मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाले. तर सरकारी आकडेवारीनुसार केवळ 72 जणांचा मृत्यूची नोंद दिल्लीत या दिवशी करण्यात आली आहे.
छत्तीसगड
छत्तीसगडमध्ये 24 तासांत 15256 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 105 मृत्यूंची नोंद झाली आहे. दिल्ली, मध्य प्रदेशप्रमाणेच छत्तीसगडमधील मृतांच्या आकडेवारीवरही संशय व्यक्त केला जात आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या छत्तीसगडच्या दुर्गमध्ये 13 एप्रिलच्या आकडेवारीनुसार 61 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर या दिवशीच्या सरकारी आकडेवारीनुसार संपूर्ण राज्यात 73 मृत्यूंची नोंद आहे.