नवी दिल्ली -देशात कोरोनाचा कहर आहे. संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात येत असतानाच कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. डेल्टा प्लस विषाणूच्या प्रसारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केंद्राला प्रश्न विचारले आहेत. कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात चाचण्या का केल्या जात नाहीत, असा सवाल राहुल गांधी यांनी शुक्रवारी केंद्राला केला.
डेल्टा प्लस या व्हेरिएंटचा प्रसार रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चाचण्या का घेतल्या जात नाहीत. डेल्टा प्लस व्हेरिएंटविरूद्ध लस किती प्रभावी आहेत आणि यासंदर्भातील संपूर्ण माहिती कधी उपलब्ध होईल? विषाणूच्या तिसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारची काय योजना आहे, असे प्रश्न राहुल गांधींनी केंद्राला केले आहेत.
यापूर्वी काँग्रेसकडून काँग्रेसकडून कोरोनावर श्वेतपत्रिका जारी करण्यात आली होती. तिसऱ्या लाट देशात पसरण्यापूर्वी तयारी करण्याचे आवाहन सरकारला केले होते. कोरोनाच्या श्वेतपत्रिकेमागे सरकारवर बोट दाखविण्याचा उद्देश नाही. तर सरकारला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संसर्ग थोपविण्याकरिता देशाला मदत करण्याचा उद्देश आहे. संपूर्ण देशाला माहित आहे, कोरोनाची तिसरी लाट धडकणार आहे. त्यापूर्वी तयारी केली तर असंख्य लोकांचे प्राण वाचू शकतील, असे राहुल गांधी म्हणाले होते.