नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसोबतच म्युकरमायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगसचाही मोठ्या प्रमाणात प्रसार होताना दिसून येत आहे. रोगप्रतिकार शक्ती कमी होणे, आणि स्टेरॉईडचा वापर हे या आजाराची लागण होण्याचे कारण मानले जात आहे. डॉक्टर याबाबत विविध प्रकारच्या थिअरी मांडत आहेत. मात्र, ज्याप्रमाणे भारतात हा आजार दिसून येत आहे, त्याप्रमाणे जगातील इतर कोणत्याही देशात ब्लॅक फंगसचा प्रसार झालेला पहायला मिळत नाहीये. यामागे काय कारण असू शकते, याचा आढावा घेण्याचा ईटीव्ही भारतने प्रयत्न केला आहे.
देशात ब्लॅक फंगसचे जेवढे रुग्ण आढळून आले आहेत, त्यांच्यापैकी बहुतांश रुग्णांना कोरोना होऊन गेला होता, किंवा मधुमेहाची लागण झाली होती. तज्ज्ञांच्या मते, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतः औषधे घेणेही ब्लॅक फंगस होण्याचे कारण ठरू शकते. तसेच, अस्वच्छ मास्कचा वारंवार केलेला वापर, औद्योगिक ऑक्सिजनचा वापर अशा कारणांमुळेही ब्लॅक आणि व्हाईट फंगसची लागण होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
देशातील मधुमेहाची समस्या गंभीर..
शार्प आय साईट रुग्णालयाचे डीन आणि सहसंस्थापक डॉ. बी कमल कपूर यांनी सांगितले, की देशातील वृद्ध लोकसंख्येपैकी ७३ टक्के लोकांना मधुमेह आहे. तसेच, रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या स्टेरॉईडच्या वापरांनीही रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते, जे मधुमेहाच्या रुग्मांना घातक असते. अशा सर्व आजारांमुळे रुग्णांना बरे होण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यामुळे रुग्णांच्या शरिरात कित्येक प्रकारचे इन्फेक्शन होतात. जोधपूर एम्समधील ईएनटी प्रमुख आणि प्राध्यापक डॉ. अमित गोयल यांनी सांगितले, की देशातील कित्येक लोक रक्तातील साखर नियमित तपासत नाहीत. तसेच, एकदा औषधे घेण्यास सुरुवात केली की ती आयुष्यभर घ्यावी लागतील या भीतीने ते औषधेही घेण्याचे टाळतात. यामुळे अशा रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होतो.
वापरलेलाच मास्क पुन्हा वापरत आहेत लोक..
डॉ. अमित म्हणाले, की देशातील लोकांचे अस्वच्छ राहणेही म्युकरमायकोसिसला आमंत्रण देत आहे. लोक एकदा वापरलेले मास्क पुन्हा पुन्हा (न धुता) वापरत आहेत. त्यामुळे ब्लॅक फंगसची लागण होताना दिसून येत आहे.