जिनिवा :जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) भारतात सर्वात पहिल्यांदा मिळालेल्या कोरोना स्ट्रेनचे नामकरण केले आहे. बी.1.617.1 आणि बी.1.617.2या दोन स्ट्रेन्सना अनुक्रमे 'काप्पा' आणि 'डेल्टा' अशी नावं देण्यात आली आहेत. सोमवारी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. या नावांसाठी यूनानी लिपीतील अक्षरांची मदत घेतल्याचे डब्ल्यूएचओने सांगितले.
डब्ल्यूएचओच्या कोविड-१९ टेक्निकल प्रमुख डॉ. मारिया वान केरखोव यांनी ट्विट करत याबाबत सांगितले. या स्ट्रेन्सना सहजपणे ओळखता यावे यासाठी ही नावे ठेवण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. तर, या स्ट्रेन्सच्या वैज्ञानिक नावांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.