संयुक्त राष्ट्रसंघ (जीनेव्हा) -कोरोनाचा डेल्टा स्ट्रेन अत्यंत संसर्गजन्य होत असल्याने जग हे अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. हा डेल्टा कोरोना सतत बदलत असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रायसस यांनी दिला आहे. ज्या देशांमध्ये लसीकरण कमी झाले आहे, त्या देशांमध्ये रुग्णालये आणखी भरत असल्याचे भयानक दृश्य दिसत आहे, याकडे आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी पत्रकार परिषदेत लक्ष वेधले.
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रायसस म्हणाले, की डेल्टा हा स्ट्रेन अनेक देशांमध्ये वाढला आहे. अजून कोणताही देश या धोक्यापासून दूर नाही. कोरोना सतत बदलत असल्याने सार्वजनिक आरोग्य यंत्रणेला बदलून प्रतिसाद दिला पाहिजे. डेल्टा व्हेरियंट हा 98 हून अधिक देशांमध्ये आढळला आहे.
हेही वाचा-कोव्हॅक्सीन कोरोनाच्या अल्फा-डेल्टा व्हेरायंटवरही परिणामकारक, अमेरिकेच्या NIH चा दावा
जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी या सुचविल्या उपाययोजना-
- कमी आणि अधिक लसीकरण असलेल्या देशांमध्येही डेल्टाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोनाचे प्रमाण कमी करण्यासाठी देशांपुढे दोन महत्त्वाचे मार्ग आहेत.
- सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक उपाययोजना त्यामुळे देखरेखीसाठी बळकट यंत्रणा होणे शक्य आहे.
- कोरोनाच्या चाचण्या, कोरोनाचे लवकर निदान, विलगीकरण आणि वैद्यकीय देखभाल या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहे.
- मास्क, शारीरिक अंतर, गर्दीच्या जागा टाळणे आणि घरामध्ये पुरेशी हवा खेळती राहणे अशा उपाययोजना कराव्यात.
- पुढील वर्षापर्यंत जगातील प्रत्येक देशांमध्ये 70 टक्के लसीकरण होण्यासाठी जगभरातील नेत्यांनी एकत्रित यावे, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी केले.
- कोरोना महामारीचा वेग कमी करणे, लोकांचे प्राण वाचविणे आणि जागतिक अर्थव्यवस्था खरोखर सावरण्याकरिता उत्कृष्ट मार्ग आहे. त्यामुळे अधिक धोकादायक कोरोनाच्या व्हेरियंटपासून वाचता येणे शक्य होणार आहे.
- वर्षाखेर जगभरातील सर्व देशांमध्ये किमान 10 टक्के लसीकरण व्हावे, असे आवाहनही त्यांनी जागतिक नेत्यांना केले.