जिनेव्हा -जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातल्याने अनेक देशाच्या अर्थव्यवस्था आणि जीवनमान ढासाळले आहे. या कोरोना लढ्यात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जागतिक साथीविरुद्ध लढ्यात भारत देत असलेल्या निरंतर सहकार्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने भारत आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
एकमेकांच्या सहकार्याने आणि परस्पर विचाराने आपण महामारीचा सामना करून लोकांचं जीवन वाचवू शकतो, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रायसस यांनी ट्विटर संदेशात म्हटलं.
भारताची शेजारी देशांसह मित्र देशांना मदत -
कोरोना लसीकरणासाठी भारताने शेजारी देशांसह मित्र देशांना लसीचा पुरवठा सुरू केला आहे. म्यानमार, सेशल्स आणि मॉरिशस या देशांना काल (शुक्रवार) सीरम कंपनीच्या 'कोव्हिशिल्ड' लसीचा पुरवठा केला. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून ही लस या देशांना पाठविण्यात आली. नेपाळ, भूटान, अफगाणिस्तान, बांगलादेशलाही भारताकडून कोरोना लस देण्यात येत आहे. यापूर्वही जेव्हा कोरोनावरील उपचारांसाठी हायड्रोक्सिक्लोरोक्विनच्या गोळ्या परिणामकारक ठरतात असे काही शास्रज्ञांनी म्हटलं होते. तेव्हा अमेरिकेसह 150 देशांना हायड्रोक्सिक्लोरोक्विनच्या गोळ्यांचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा भारताने केला होता.