महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Bullet Train : अजूनही प्रतीक्षाच! कधी धावणार देशाची पहिली बुलेट ट्रेन? - मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन

भारतातील पहिली बुलेट ट्रेन रुळावरून कधी धावणार याची प्रतीक्षा वाढते आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा वेग मंदावला आहे. पाच वर्षांत केवळ 30 टक्के काम पूर्ण झाले आहे.

Mumbai Ahmedabad bullet train
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन

By

Published : Jun 17, 2023, 7:25 PM IST

नवी दिल्ली :देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या लोकांची प्रतीक्षा वाढतेच आहे. बहुप्रतीक्षित मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला अद्याप गती मिळालेली नाही. अधिकृत आकडेवारीनुसार, 31 मार्च 2023 पर्यंत केवळ 30.15 टक्के काम झाले आहे. गुजरातमध्ये प्रगती एक तृतीयांशपेक्षा थोडी जास्त आहे. येथे सुमारे 35.23 टक्के काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्रात मात्र केवळ 19.65 टक्के काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत एकूण 272.89 किमीचे काम पूर्ण झाले आहे.

प्रकल्पाला 4 वर्षे विलंब : मार्चमध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होते की, 'सरकार पहिली बुलेट ट्रेन चालवण्यासाठी ऑगस्ट 2026 चे लक्ष्य ठेवत आहे. 2027 पर्यंत तिचा विस्तार करण्यात येणार आहे.' यापूर्वी हा प्रकल्प डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले होते. याचाच अर्थ प्रकल्प पूर्ण होण्यास मूळ मुदतीपासून चार वर्षांचा विलंब होऊ शकतो.

1.08 लाख कोटी रुपयांचा खर्च : भारतातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल प्रकल्पाचा (MAHSR) अंदाजे खर्च सुमारे 1,08,000 कोटी रुपये आहे. ऑगस्ट 2026 पर्यंत सुरत-बिलीमोरा (63 किमी) दरम्यान ट्रायल रन करण्याचे लक्ष्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांनी 14 सप्टेंबर 2017 रोजी या प्रकल्पाची पायाभरणी केली होती.

320 किमी प्रतितास वेगाने धावेल :मुंबई-अहमदाबाद कॉरिडॉरचे एकूण अंतर 508 किमी आहे. महाराष्ट्रात बुलेट ट्रेनचा मार्ग 156 किमी असेल, तर गुजरातमध्ये तो 352 किमीचा आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) नुसार, बुलेट ट्रेन कमाल 320 किमी प्रतितास वेगाने धावेल. ती मुंबई-अहमदाबाद दरम्यानचे अंतर फक्त 127 मिनिटांत कापेल.

बुलेट ट्रेनचा मार्ग : TCFS स्थानावरील फ्लेमिंगो आणि सभोवतालच्या समृद्ध खारफुटीमधील इतर वन्यजीवांना त्रास होऊ नये म्हणून, बुलेट ट्रेन कॉरिडॉर परिसरातील समुद्राखालील बोगद्यामधून जाईल. 13.2 मीटर व्यासाचा आणि देशातील सर्वात लांब रेल्वे वाहतूक मार्ग असलेला हा भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा असेल. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सपासून सुरू होणारी बुलेट ट्रेन अहमदाबादमधील साबरमती स्थानकापर्यंत पोहोचेल. ती महाराष्ट्रातील तीन जिल्हे, गुजरातमधील आठ जिल्हे, दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशांमधून जाणार आहे. मुंबई-बीकेसी, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती हे बुलेट ट्रेनचे प्रस्तावित थांबे असतील.

हेही वाचा :

  1. Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला सात वर्षे पूर्ण; वाचा A to Z माहिती
  2. Mumbai-Hyderabad Bullet Train : मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम लवकरच सुरु; अंतिम डीपीआर सादर
  3. Bullet Train Work : बुलेट ट्रेनच्या कामावर दररोज असणार ड्रोनची नजर

ABOUT THE AUTHOR

...view details