नवी दिल्ली :कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशाला जबर तडाखा बसला आहे. मात्र, यादरम्यान जगभरातील कित्येक देश भारताच्या मदतीला धावून येत आहेत. अमेरिका, ब्रिटन, जपान अशा कित्येक देशांनी भारताला वैद्यकीय उपकरणे, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजन पुरवला आहे. या गोष्टीला तुम्ही 'मदत' म्हणत आहात, मात्र आम्ही याला 'मैत्री' म्हणतो असे मत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केले आहे.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जयशंकर जगभरातून भारताला मिळत असलेल्या मदतीबाबत बोलत होते. ते म्हणाले, की कोरोना ही जागतिक महामारी आहे. औषधांबाबत बोलायचे झाल्यास, आपण अमेरिका, सिंगापूर यासह कित्येक युरोपीय देशांना हायड्रोक्लोरोक्वाईन पाठवले होते. तसेच कित्येक देशांना आपण लसीदेखील पाठवल्या आहेत. या देशांनी भारताला मदत मागितली नव्हती, तसेच भारतानेही अद्याप अधिकृतरित्या कोणाला मदत मागितली नाही. त्यामुळे या 'मदती'ला मी 'मैत्री' म्हणेल, असे जयशंकर म्हणाले.