सूरत : भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात अनेक वीर सेनानींनी आपल्या प्राणांची बाजी लावली आहे. महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्यात दिलेल्या योगदानामुळेच त्यांना राष्ट्रपिता असे संबोधले जाते. स्वातंत्र्य लढ्यात दोन महत्वाच्या चळवळी झाल्या आहेत. त्यामध्ये सशस्त्र चळवळ आणि दुसरी अहिंसक चळवळीचा समावेश आहे. महात्मा गांधीजींनी मिठावरील कर रद्द करण्यासाठी दांडी यात्रा काढण्याचे ठरवले. त्यानुसार १२ मार्च १९३० ला महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा काढून मिठाचा सत्याग्रह केला. जाणून घेऊया काय आहे दांडी यात्रेचा इतिहास.
दांडी यात्रेत सुरुवातीला होते ३० स्वयंसेवक :महात्मा गांधी यांनी व्हाईसराय इर्वीन यांच्याकडे काही अटी ठेवल्या होत्या. मात्र व्हाईसराय इर्वीन यांनी त्या फेटाळल्याने दांडी मार्च काढण्याचे निश्तित झाले. दांडी यात्रेच्या संध्याकाळी, गांधीजींनी साबरमती आश्रमात प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. यामध्ये सुमारे 60 हजार नागरिकांची गर्दी होती. गांधीजींनी त्यांना संबोधित केले. सुरुवातीला 30 स्वयंसेवक दांडी यात्रेत सहभागी झाले होते. मात्र यात्रा जसजशी पुढे जात होती, तशी संख्या वाढत गेली. यात्रेत वय 20 ते 60 वर्षाच्या स्वयंसेवकांचा समावेश होता. सर्वात वृद्ध महात्मा गांधीजी होते. गुजरात, पंजाब, महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश, ओडिशा, बंगाल, उत्तर प्रदेश आणि नेपाळ येथील स्वयंसेवकांनीही दांडी यात्रेत सहभाग घेतला. १२ मार्चला दांडी यात्रेचा ९१ वा वर्धापन दिन आहे. १२ मार्चला महात्मा गांधींनी साबरमती आश्रमातून दांडीला जाण्यासाठी पदयात्रा काढली. त्यानंतर 26 दिवसांनी 241 मैलांचा प्रवास करत 5 एप्रिलला महात्मा गांधी दांडीला पोहोचले.
दांडी मार्चबद्दल मनोरंजक गोष्टी :दांडी यात्रा ही मिठाचा सत्याग्रह म्हणूनही ओळखले जाते. मिठावर ब्रिटिशांनी कर लादलेला होता. समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करण्यात येत होते. मात्र त्यावरही कर लावल्याने महात्मा गांधीजींनी सत्याग्रहाची सुरुवात केली. ब्रिटिशांच्या सत्तेमुळे भारतीयांना मीठ स्वतंत्रपणे उत्पादन करता आले नाही. त्यामुळे नागरिकांना मीठ विकत घेणे भाग पडले. महात्मा गांधींनी पुकारलेल्या दांडी यात्रेमध्ये भारतीय नागरिक सामील झाले. गांधींनी दांडी यात्रेचे नेतृत्व त्यांच्या साबरमती येथील आश्रमातून केले. गांधीजींनी ही चळवळ साबरमती आश्रमापासून सुरू केल्यानंतर अनेक गट त्यांना येऊन मिळाले. दांडीला पोहोचायला यात्रेला तब्बल २४ दिवस लागले.