नवी दिल्ली : मोठ्या टेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या नोकर कपातीची प्रक्रिया सुरू आहे. उच्च नियुक्ती, अनिश्चित जागतिक आर्थिक परिस्थिती, कोविड-19 साथीच्या रोगामुळे निर्माण होणारी असुरक्षितता हे यामागील कारणे असल्याचे सांगितले जाते आहे. तर नोकर कपात करण्याबाबत 'या' टॉप टेक कंपन्यांचे काय म्हणणे आहे ते जाणून घेऊया.
मेटा (11,000 नोकर कपात करणार) : मेटाचे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकेरबर्ग म्हणाले, कोविडच्या सुरूवातीस, जग अधिकाधिक ऑनलाइनकडे वळले आणि ई-कॉमर्सच्या तेजीमुळे महसूल वाढला. तसेच ऑनलाइनची मागणी ही महामारी संपल्यानंतरही सुरू राहील आणि ही शाश्वत वाढ होईल, असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता, म्हणून मी माझ्या गुंतवणुकीत लक्षणीय वाढ करण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवाने, ते माझ्या अपेक्षेप्रमाणे झाले नाही. आम्ही केवळ ऑनलाइन कॉमर्सच्या पूर्वीच्या ट्रेंडवर परत आलो नाही, तर आर्थिक मंदी, वाढलेली स्पर्धा आणि जाहिरातींचे नुकसान झाले, यामुळे आमची इनकम कमी झाले. यामध्ये माझी चूक होती आणि मी त्याची जबाबदारी घेतो.
गूगल (12,000 नोकर कपात करणार) : Alphabet आणि Google चे CEO सुंदर पिचाई यांच्या मते, गेल्या दोन वर्षांत आम्ही डीजीटल क्षेत्रात लक्षणीय वाढ पाहिली आहे. त्या लक्षणीय वाढीस लागणारा पैसा गुंतवतांना प्रचंड गोष्टी कराव्या लागल्या. आमच्या ध्येयाची ताकद, आमची उत्पादने आणि सेवांचे मूल्य आणि AI मधील आमच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीमुळे मिळालेल्या प्रचंड संधीबद्दल मला खात्री आहे. आणि हे पूर्णपणे साध्य करण्यासाठी, आपल्याला योग्य निवडी कराव्या लागतील.
मायक्रोसॉफ्ट (10,000 नोकर कपात करणार) : मायक्रोसॉफ्टचे प्रमुख आणि सीईओ सत्या नडेला म्हणाले की, आम्ही पाहिले की महामारीच्या काळात ग्राहकांनी डिजिटल खर्चावर जोर दिला. आता आम्ही आमचा डिजिटल खर्च कमी करण्याचा विचार करत आहोत. आपण हे देखील पाहत आहोत की, प्रत्येक उद्योग आणि संस्था सावधगिरी बाळगत आहेत, कारण जगातील काही भाग मंदीच्या गर्तेत आहेत आणि इतर भाग मंदीचा अंदाज घेत आहेत.