कोलकाता :पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमधील खारग्राममध्ये फेर मतदानापूर्वी दगडफेकीची घटना समोर आली आहे. पोलिसांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातील 696 बूथवर आज फेरमतदान होणार आहे. निवडणूक निष्पक्ष आणि शांततेत पार पडावी यासाठी निवडणूक आयोगाकडून व्यापक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. बंगाल निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, परिसरात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पोलिसांच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आली. पश्चिम बंगाल निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केले की, आज 696 बूथवर पुन्हा मतदान घेण्यात येईल, जेथे शनिवारी झालेल्या पंचायत निवडणुकीदरम्यान मतदान अवैध घोषित करण्यात आले होते.
बूथवर पुनर्मतदानाचे आदेश : राज्याच्या ग्रामीण भागातील 73,887 जागांसाठी शनिवारी झालेल्या मतदानात सुमारे 61,636 मतदारांनी 61,636 मतदान केंद्रांवर मतदान केले. त्यांनी 2.06 लाख उमेदवारांचे भवितव्य ठरवले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने (एसईसी) रविवारी संध्याकाळी एक बैठक घेतली. मतदानात छेडछाड आणि हिंसाचाराच्या अहवालांची दखल घेतली आणि आदेश पारित केला. या घटनांचा परिणाम अनेक ठिकाणी मतदानावर झाला. ज्या बूथवर पुनर्मतदानाचे आदेश देण्यात आले आहेत, तेथे किमान चार केंद्रीय पोलीस दलाचे कर्मचारी तैनात केले जातील.
पंचायत निवडणुकीदरम्यान हिंसाचार : पुनर्मतदान जाहीर झालेल्या जिल्ह्यांपैकी मुर्शिदाबादमध्ये सर्वाधिक 174 बूथ आहेत, त्यानंतर मालदामध्ये 110 बूथ आहेत. पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस रविवारी नवी दिल्लीला रवाना झाले, जिथे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन राज्यातील पंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचाराचा अहवाल सादर करतील अशी अपेक्षा आहे.