कोलकाता :पश्चिम बंगालमध्ये आज सकाळपासून पंचायत मतदानाला सुरुवात झाली. मात्र मतदानादरम्यान कूचबिहारमधील सीताई येथील बारविता प्राथमिक शाळेतील मतदान केंद्राची तोडफोड करण्यात आली. यावेळी काही समाजकंटकांनी मतपत्रिका जाळल्याने घटनास्थळावर मोठा तणाव निर्माण झाला. पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीसाठी आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. राज्यातील विविध भागात शांततेत मतदान सुरू झाले आहे. अनेक मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. दरम्यान या मतदानाच्या वेळी उफाळलेल्या हिंसाचारात तब्बल पाच कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे.
मतदान केंद्रावर तोडफोड झाल्याने खळबळ :कूचबिहारमध्ये काँग्रेस-सीपीआयएम आघाडीच्या कार्यकर्त्यावर टीएमसी समर्थकांनी गोळ्या झाडल्याचा आरोप करण्यात आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याचवेळी मुर्शिदाबादच्या समशेरगंज भागात टीएमसी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. पश्चिम बंगालच्या कूचबिहारमध्ये काँग्रेस-सीपीआयएम आघाडीच्या कार्यकर्त्यावर तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी गोळ्या झाडल्या. त्यांच्यावर दिनहाटा उपविभागीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पीडिताने थेट टीएमसी नेत्यावर हल्ल्याचा आरोप केला. काही समाजकंटकांनी सीताई येथे शाळेत मतदानाचे साहित्याला तोडफोड केल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता.