महाराष्ट्र

maharashtra

मी भारतीय जनता पक्षासाठी नाही, भारतीय जनतेसाठी काम करतो; पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी ठणकावलं

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 23, 2023, 9:51 AM IST

Updated : Nov 23, 2023, 2:21 PM IST

West Bengal Governor Interview : महाराष्ट्रात सरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष रंगला होता. तशाच प्रकारचा संघर्ष आता पश्चिम बंगालमध्ये रंगत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महत्वाची विधेयक राज्यपालांनी रखडवल्याचा आरोप केला. त्यासाठी राजभवनात आंदोलन करण्याची धमकी ममता बॅनर्जी यांनी दिली. मात्र नुकताच राज्यपाल सी व्ही आनंद बोस यांनी एक वर्ष पूर्ण केलं आहे. त्यांची ईटीव्ही भारत प्रतिनिधींनी घेतलेली मुलाखत पहा

West Bengal Governor Interview
राज्यपाल सी व्ही आनंद बोस

पश्चिम बंगालचे राज्यपाल सी व्ही आनंद बोस यांची मुलाखत

कोलकाता West Bengal Governor Interview : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी महत्वाचे विधेयक रखडवून ठेवल्याचा आरोप केला आहे. त्यासाठी राजभवनात आंदोलन करण्याची धमकी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली. याप्रकरणी सरकार आणि राज्यपालांमध्ये महाराष्ट्रात झालेल्या वादासारखाच वाद पश्चिम बंगालमध्ये सुरू असल्याचा चर्चा करण्यात येत आहे. या वादावर आता राज्यपाल सी व्ही आनंद बोस यांनी भाष्य केलं आहे. आपण भारतीय जनता पक्षासाठी नव्हे, तर भारतातील नागरिकांसाठी काम करत असल्याचं राज्यपाल सीव्ही आनंद यांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या खास मुलाखतीत स्पष्ट केलं.

राज्यपाल सी व्ही आनंद बोस

मी पक्षासाठी नाही, तर जनतेसाठी काम करतो :पश्चिम बंगालचे राज्यपाल बोस यांनी नुकताच आपल्या राज्यपालपदाचा एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला आहे. यावेळी ईटीव्ही भारतनं त्यांची मुलाखत केली. यावेळी बोलताना राज्यपाल सी व्ही आनंद बोस म्हणाले, "मी कोणत्याही पक्षासाठी नाही, तर जनतेसाठी काम करतो, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. तुम्ही प्रशासकीय संकुलात काम करता, तेव्हा मतभेद असू शकतात. पण याचा अर्थ दोन घटनात्मक संस्थांमधील संबंध बिघडले, असा होत नाही. निवडून आलेल्या सरकारनं राज्यपालांच्या विचारसरणीचं पालन करणं अपेक्षित नाही. आपण असहमत असतानाही सहमत होणं हा लोकशाहीचा स्वभाव आहे. आपण पूर्ण नम्रतेनं केलं पाहिजे" असंही राज्यपालांनी यावेळी सांगितलं.

राज्यपाल सी व्ही आनंद बोस

ममता बॅनर्जीनं दिली राजभवनात आंदोलनाची धमकी :महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात वाद झाल्याचं जगजाहीर आहे. त्याचप्रकारचा वाद आता पश्चिम बंगालमध्ये होत असल्याचं दिसून येत आहे. राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी अनेक विधेयकं प्रलंबित ठेवल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. ममता बॅनर्जी यांनी विविध मुद्द्यांवरुन राज्यपालांवर टीका केली. इतकच नाही, तर राजभवनात आंदोलनाला बसण्याची धमकीही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली. याबाबत बोलताना राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस म्हणाले, की "राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात परस्पर आदर आणि समजूतदारपणा हे आमच्या नातेसंबंधाचं वैशिष्ट्य आहे. निवडून आलेले मुख्यमंत्री आणि नियुक्त राज्यपाल प्रत्येक मुद्द्यावर नेहमीच समान दृष्टिकोन ठेवू शकत नाहीत" असंही राज्यपाल सी व्ही आनंद बोस यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यपालपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं होणाऱ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राजभवनात उपस्थित राहतील का, असा प्रश्न राज्यपालांना ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी विचारला, मात्र यावर बोलणं त्यांनी टाळलं. "कोणत्याही विशेष कार्यक्रमाची, उत्सवाची गरज नाही. मात्र, नवीन चेहरे, तरुण-तरुणींच्या उपस्थितीवर भर दिला जाणार आहे" असं त्यांनी यावेळी सांगितलं.

राज्यपाल सी व्ही आनंद बोस

राज्यपालांनी केलं मुख्यमंत्र्यांचं कौतुक अन् टीकाही : राज्यपाल सी व्ही बोस यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं यावेळी कौतुक केलं. मात्र दुसरीकडं राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत आपण फारसं खूश नसल्याचंही स्पष्ट केलं. कायदेशीर शिस्तीची व्याप्ती गुंतागुंतीची आहे. तरीसुद्धा, मला असं दिसून आलं आहे, की काही घटनांनी प्रस्थापित प्रणालीला अडथळा आणला आहे. काही प्रकरणांत सरकारला स्थिती पूर्ववत करण्यासाठी शिफारसी करण्यात आल्या आहेत. त्यावर कारवाई देखील सुरू करण्यात आली आहे, परंतु काही भागात स्थिती कायम आहे. हिंसक घटनांच्या संदर्भात राज्य सरकार किंवा पोलिस प्रशासनानं उचललेली पावलं समाधानकारक मानली जात नाहीत" असंही राज्यपाल सी व्ही आनंद बोस यावेळी म्हणाले.

माझं हृदय पूर्णपणे बंगाली आहे :पश्चिम बंगालमधील आपल्या एका वर्षाच्या अनुभवावर राज्यपाल म्हणाले की, "मी बंगालीमध्ये खूप खूश आहे. बंगालच्या सुंदर लोकांनी त्यांच्या परस्पर आदर, सहकार्य आणि प्रेमानं मला प्रभावित केलं आहे. बंगालच्या जनतेशी हा संवाद मला कायम ठेवायचा आहे. मी स्वत:ला बंगालसाठी समर्पित केलं आहे. मला असे वाटते की माझं हृदय पूर्णपणे बंगाली आहे. माझं नावही बंगाली आहे. माझे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. स्वातंत्र्याच्या लढ्यात त्यांचे आदर्श आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं धैर्य यानं मला आणखी प्रेरणा दिली" असंही राज्यपाल सी व्ही आनंद बोस यांनी यावेळी सांगितलं. तर आपलं गृहराज्य केरळ आणि पश्चिम बंगाल यांच्यात तुलना करताना राज्यपाल सी व्ही आनंद बोस म्हणाले, की दोन्ही राज्यांतील लोक स्वतंत्र विचारसरणीचे आहेत. इतिहासात बंगाल आणि केरळ ही एकाच आईची दोन मुलं असल्याचं मी मानतो" असंही त्यांनी यावेळी सागंतिलं.

हेही वाचा :

  1. Mamata Banerjee On Amit Shah : बंगालमध्ये सरकार पाडण्याचा प्रयत्न, अमित शाहांना गृहमंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही - ममता बॅनर्जी
  2. Ananda Bose : आनंद बोस बुधवारी पश्चिम बंगालचे नवे राज्यपाल म्हणून घेणार शपथ
Last Updated : Nov 23, 2023, 2:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details