कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. 5 जिल्ह्यातील एकूण 30 विधानसभा मतदारसंघात मतदान सुरू आहे. बाकुंडा जिल्ह्यातील, पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील 6, पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील 7, झाडग्राम जिल्ह्यातील 4 तर पुरुलिया जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यातील सर्व बूथ संवेदनशील आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 10 राजकीय पक्षांच्या एकूण 191 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. राज्यांच्या निवडणुका आठ टप्प्यात पूर्ण होतील. आज 170 पुरुष आणि 21 महिला उमेदवारांचे भवितव्य मतपेटीतबंद होईल. राज्यांमधील मतदारसंघांमध्ये सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होईल. कोरोना आजारपणामुळे वेळ एका तासाने वाढविण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 10 हजार 288 मतदान केंद्र आहेत. तर मतदारांची संख्या 73 लाख 80 हजार 942 आहे.
कोणाचे किती संख्याबळ -
2016 च्या बंगाल निवडणुकीत तृणमूलने 30 पैकी 26 जागा जिंकल्या होत्या. बंगालमधील 30 जागांपैकी भाजपा 29 जागा लढवत आहे. त्यापैकी एक अखिल झारखंड विद्यार्थी संघटनेला (एजेएसयू) देण्यात आली आहे. तृणमूलही 29 जागा लढवणार असून एका जागेसाठी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. तर काँग्रेस केवळ पाच जागांवर निवडणूक लढवेल. तर उर्वरीत जागा डावे पक्ष लढवत आहेत. त्यापैकी सीपीएम 18 आणि सीपीआय 4 जागावर आपले उमेदवार मैदानात उतरवतील.
(एकूण 30 जागांमध्ये भाजपा 30 तृणमूल काँग्रेस 30, सीपीआय 4, सीपीआय (एम) एल 1, काँग्रेस 6, एसयुसीआय 28, एआयएफबी 2, बीएसपी 11, आयएनडी 43, इतर 20 असे उमेदवार रिंगणात आहेत. चार अनुसूचित जाती व सात अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे.)