खेला होबे (खेळ सुरू झाला आहे) असे त्या म्हणाल्या होत्या. त्यांच्यासाठी हा इतिहास जमा होण्याचा किंवा इतिहास घडवण्याचा प्रश्न होता. ईव्हीएम यंत्रांनी जसा जनादेशाचा कौल जाहीर करण्यास सुरूवात केली, तसे बंगालच्या लोकांनी इतिहास घडवण्याच्या बाजूने कौल दिला आहे, असे स्पष्ट झाले. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी या फक्त खेला होलो ( खेळ खेळला गेला) इतकेच म्हणू शकल्या असत्या. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी सलग तिसऱ्यांदा तृणमूल काँग्रेसला आणखी एक शानदार विजय मिळवून दिल्यानंतर अनेक प्रश्न आज उभे राहिले आहेत.
प्रस्थापित विरोधी लाटेविरोधात आणि भाईभतिजावाद तसेच तृणमूलमधील पक्षपातीपणाच्या एकाहून एक प्रखर आरोपांवर मात करून, ममता बॅनर्जी आजच्या काळातील बंगालच्या राजकारणात सर्वात उत्तुंग नेत्या म्हणून उदयास आल्या आहेत. आणि दुसरे म्हणजे, आजच्या विजयामुळे, केंद्रातील भाजपविरोधी पक्षांच्या गटातील सर्वात आघाडीवरील नेत्या म्हणूनही ममता बॅनर्जी या उभरल्या आहेत. त्यांच्या विजयामुळे तृणमूलच्या राष्ट्रीय आकांक्षा तसेच संपूर्ण भारतभराच्या राजकीय अवकाशात त्यांच्या नेतृत्वाला वाढत्या प्रमाणात मान्यता मिळत असल्याचीही खात्री पटली आहे.
मतदारांचे धार्मिक आधारावर ध्रुविकरण करण्याची भाजपची मोहिम त्यांच्यावरच अक्षरशः उलटली आहे, असे बंगालमधील सूक्ष्मपातळीवरील स्थितीकडे डोकावून पाहिले असता सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट दिसते. माल्दा आणि मुर्शिदाबाद तसेच दक्षिण २४ परगणा आणि उत्तर २४ परगणा तसेच हावडा जिल्ह्यातील काही भागांतील आलेले निकाल, मुस्लिम मतदारांनी कोणत्याही अन्य पक्षांपेक्षा तृणमूल काँग्रेसचा पर्याय निवडला आहे, असेच दर्शवतात. माल्दा आणि मुर्शिदाबाद हे काँग्रेसचे एकेकाळी बालेकिल्ले होते. त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला एकगठ्ठा मतदान केले आहे. ममता आणि तृणमूल काँग्रेस यांच्या अनेक चुका आणि त्यांच्यावर कित्येक आरोप असतानाही, केवळ भाजपला दूर ठेवण्यासाठी त्यांनी तृणमूल काँग्रेसला निवडले आहे, याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
बंगालमधील तिसरा राजकीय अवकाश म्हणून ओळखली जाणारी डावी आघाडी आणि त्यांचे मित्र पक्ष, काँग्रेस आणि एआयएसएफ हे आणखीच आकुंचित झाले आहेत. याचे कारण काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या परंपरागत मतदारांनी तृणमूल काँग्रेसला निवडले आहे. येथेही साधे कारण आहे. २०१९ मध्ये भाजपने जी मुसंडी मारली होती, ती थांबवण्यासाठी त्यांनी ममतांना मतदान केले आहे. भाजपने २०१९ मध्ये १८ लोकसभा जागा जिंकल्यामुळे त्यांचे रूपांतर १२१ विधानसभा मतदारसंघातील विजयामध्ये होईल, अशी भाजपला आशा होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा करिष्मा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा तसेच कैलाश विजयवर्गीय, बीएल संतोष आणि अरविंद मेनन यांनी तयार केलेली मतदानविषयक व्यूहरचना यावर भाजपची मदार होती. ममता बॅनर्जी आणि त्यांची व्यूहनीती आखणाऱ्यांनी शांत राहून तयार केलेल्या वेगळ्याच अंतप्रवाहाला समजून घेण्यात भाजप अपयशी ठरला.