नवी दिल्ली :उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडी ( North India Temperature Cold Wave ) आणि धुक्याचा प्रकोप सुरूच आहे. काश्मीरमधील अनेक भागात पारा उणेपर्यंत पोहोचला आहे. श्रीनगरमध्ये तापमान शून्याच्या खाली आहे. तसेच धुक्यापासून दिलासा मिळत नाही. पंजाबमधील भटिंडा येथे सकाळी 5.30 वाजता 25 मीटरपेक्षा कमी दृश्यमानता नोंदवण्यात आली आहे. आग्रामध्ये शून्य दृश्यमानता होती. त्याच वेळी, हिमाचलच्या सोलनमध्ये तापमान उणे 11 अंशांवर पोहोचले आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे हवामानात बदल होण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. हवामान खात्यानुसार, 11 ते 13 जानेवारी दरम्यान डोंगराळ भागात हिमवृष्टी आणि हलका पाऊस होऊ शकतो.( Weather Update Today )
तापमानाची नोंद :नारनौल हे हरियाणातील सर्वात थंड ठिकाण राहिले, जेथे किमान तापमान 2.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पंजाबमधील बालचौर येथे किमान तापमान ३.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी असलेल्या चंदीगडमध्ये किमान तापमान पाच अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हवामान खात्याने सांगितले की, राजस्थानमधील सीकरमधील फतेहपूर येथे किमान तापमान ०.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. यानंतर चुरूमध्ये 1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.तर जम्मू आणि काश्मीरमध्ये, खोऱ्याचे प्रवेशद्वार असलेल्या काझीगुंडमध्ये उणे 5.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर कुपवाडा या सीमावर्ती जिल्ह्यात उणे 5.6 अंश तापमान नोंदवले गेले. श्रीनगरचे किमान तापमान उणे ५.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
अनेक भागांमध्ये दाट धुके पसरले :गेल्या २४ तासांत विदर्भ, तेलंगणा, किनारी आंध्र प्रदेश, किनारपट्टी तमिळनाडू आणि लक्षद्वीपमध्ये हलका पाऊस झाला. हरियाणा, उत्तर-पश्चिम राजस्थान, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या अनेक भागांमध्ये दाट धुके पसरले आहे. उत्तर मध्य प्रदेश, बिहारचा काही भाग आणि पूर्व उत्तर प्रदेश, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि त्रिपुरामध्ये एक किंवा दोन ठिकाणी दाट धुके दिसले. पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या अनेक भागांमध्ये आणि बिहारच्या काही भागांमध्ये थंड दिवसापासून गंभीर थंड दिवसाची स्थिती होती.
दाट धुके पडण्याची शक्यता : हवामान अंदाज एजन्सी स्कायमेटच्या मते, पुढील 24 तासांमध्ये पंजाबपासून बिहार, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशपर्यंत गंगेच्या मैदानावर काही ठिकाणी खूप दाट धुके आणि अनेक ठिकाणी दाट धुके पडण्याची शक्यता आहे. उत्तर आणि पूर्व राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या उत्तर भागात मध्यम धुके पडण्याची शक्यता आहे.
काही भागात थंडीची लाट : राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये थंडीची लाट कायम राहू शकते. गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद आणि जम्मू-काश्मीरच्या वरच्या भागात हलका पाऊस आणि बर्फ पडण्याची शक्यता आहे. 8 जानेवारीपासून या राज्यांमध्ये पावसाची तीव्रता आणि प्रसार वाढेल आणि हिमाचल प्रदेशातही बर्फवृष्टी होईल. तेलंगणा, किनारी आंध्र प्रदेश आणि अंदमान निकोबार बेटांवर हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.